मुंबई: 'अजित पवारांशी चर्चा करण्याआधी आम्ही शरद पवारांची परवानगी घेतलेली नव्हती. चांगल्या कामासाठी त्यांची परवानगी घ्यायला हवी असं मला वाटत नाही,' असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनी आज सांगितलं. शिवसेना व काँग्रेसच्या सोबत आघाडी करून सत्तास्थापनेच्या निर्णयाप्रत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात बंडखोरी करून यांनी भाजपशी हातमिळवणी केली आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली. त्यामुळं राज्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाली आहे.
अजित पवार यांनी आपला निर्णय बदलून पुन्हा पक्षासोबतच यावे यासाठी त्यांची मनधरणी सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे-पाटील व जयंत पाटील यांनी रविवारी त्यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर आज छगन भुजबळ यांनी अजित पवारांशी चर्चा केली. वळसे-पाटील हेही त्यांच्यासोबत होते. तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास चार तास चर्चा झाली.
या भेटीनंतर छगन भुजबळ व वळसे-पाटीलय यांनी पत्रकारांशी संवाद साधला खरा, मात्र चर्चेचा तपशील सांगण्यास नकार दिला. 'अजित पवार यांचं मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सकारात्मक पद्धतीनं चर्चा सुरू आहे. मात्र, अद्याप अंतिम निर्णयापर्यंत आलेलो नाही. गरज वाटल्यास त्यांना पुन्हा भेटू,' असं भुजबळ यांनी सांगितलं.