Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पंकजा मुंडेंनी भगवानगडावरील महाप्रसादाचं ताट नाकारलं धनंजयांनी स्वीकारलं -महंत नामदेव शास्त्री; भगवानगडावर राजकीय भाषण नाही

Beedrepoter


बीड :- भगवान गडावरील महाप्रसादाचे ताट पुर्वी दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे स्विकारत होते. त्यानंतर पंकजा मुंडे ते ताट स्विकारू लागल्या होत्या. परंतू आता तेच ताट पंकजा मुंडे यांनी नाकारल्याचे सांगत गडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री यांनी ते ताट आता धनंजय मुंडेंनी स्विकारल्याचे सांगितले. धनंजय मुंडेंच्या रक्तामध्ये भगवान बाबांची भक्ती असल्याचे सांगून नाकारलेला महाप्रसाद धनंजय मुंडेंना मिळाल्याचे नामदेव शास्त्रींनी एबीपी माझा या दुर चित्रवाहिनीशी बोलतांना सांगून धनंजय मुंडेंची स्तुती केली. एवढेच नव्हे तर भगवानगडावर राजकीय भाषण होणार नसल्याचंही त्यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षात धनंजय मुंडे यांनी अनेक अपमान पचवले आहेत. धनंजय मुंडे यांच्यात स्व.प्रमोद महाजन, स्व.गोपीनाथराव मुंडे आणि शरद पवार या तिघांचे गुण आहेत. त्यामुळेच त्यांना राजकारणात यश मिळत आहे. भगवान गडावर कोणत्याही प्रकारचे राजकीय भाषण होणार नाही हे पुन्हा एकदा नामदेव शास्त्रींनी यावेळी स्पष्ट केले. भगवानगडावरील दसरा मेळाव्याच्या वेळी राजकीय भाषणावरून महंत नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यात वाद झाला होता. मध्यंतरी त्या वादावर पडदा पडला होता. मात्र पुन्हा एकदा भगवानगड चर्चेत आला आहे. दोन दिवसापूर्वीच नामदेव शास्त्री यांनी आ.धनंजय मुंडे यांना मंत्री झाल्यानंतर दर्शनासाठी भगवानगडावर या असं निमंत्रण दिलं होतं. त्यानंतर आज एका मराठी दुरचित्रवाहिनीशी बोलतांना नामदेव शास्त्रींनी भगवानगडावरील महाप्रसादाचं ताट पंकजा मुंडेंनी नाकारल्याचे सांगितले. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांची स्तुती करत शास्त्रींनी धनंजय यांनी भगवान गडाच्या महाप्रसादाचे ताट स्विकारल्याचं सांगितलं.