परळी :- लाडझरी येथील जवान पंजाब राज्यामध्ये कार्यरत होता. अपघातामध्ये जवान जखमी होऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज सकाळी लाडझरी येथे शासकीय इतमामात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, तहसीलदार विपीन पाटील, गटविकास अधिकारी संजय केंद्रेंसह आदींची उपस्थिती होती. जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी लाडझरीसह परळी तालुक्यातील शेकडो नागरीक उपस्थित होते.
महेश यशवंतराव तिडके हे २०१५ मध्ये सैन्यदलात दाखल झाले होते. वर्षभरापूर्वी महेश तिडके यांचा विवाह झाला होता. ते ७०-१० बटालियन भटींडा (पंजाब)मध्ये सैन्यात कार्यरत होते. १९ डिसेंबरला भटिंडा येथे कर्तव्यावर असताना समोरून येणार्या चारचाकी वाहनाने महेश यांना जोराची धडक दिली. यात ते गंभीररित्या जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना भटिंडी येथील रुग्णालयात दाखल केले होते. अकरा दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनाची माहिती लाडझरीसह परळी तालुक्यात झाल्यानंतर सर्वत्र शोककळा पसरली. आज सकाळी त्यांच्या पार्थीवदेहावर लाडझरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, तहसीलदार विपीन पाटील, गटविकास अधिकारी संजय केंद्रेसह या भागातील नागरीक, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. जवानाच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, दोन बहिणी, असा परिवार आहे. विशेष म्हणजे महेश यांचा मोठा भाऊ सुद्धा सैन्यामध्ये जम्मु येथे कार्यरत आहे.
(रिपोर्टर)
