नवी दिल्ली, 15 एप्रिल : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भारतात 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल रोजी केली. यासाठी आज गृहमंत्रालयाने नियमावली (Guideline) जाहीर केली आहेत. यात शेती आणि विशिष्ट उद्योगांसाठी ग्रामीण भागांना विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. तर, हवाई सेवा, रेल्वे सेवा, टॅक्सी, मेट्रो, सब यांसारख्या सर्व सेवा बंद राहणार आहेत. तसेच, यामध्ये 3 मेपर्यंत लॉकडाऊनमध्ये कसे नियम असतील याबबात सूचना देण्यात आल्या आहेत.
गृहमंत्रालयाच्या वतीने 20 एप्रिलनंतर हॉटस्पॉट आणि सील केलेल्या भागांसाठी एक वेगळी नियमावली असणार आहे. नव्या नियमावलीमध्ये देण्या आलेल्या सवलती या हॉटस्पॉट आणि सील प्रदेशांना लागू होणार नाहीत. हे हॉटस्पॉट्स फक्त आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांद्वारेच राहतील.
या सेवांना सवलती
या मार्गदर्शक सूचनांनुसार रुग्णालये, किराणा दुकान, शेती, ऑनलाईन टीचिंग, मासेमारी या सर्वांना सवलती देण्यात आल्या आहेत. या सर्व सवलती ग्रामीण भागांत आणि हॉटस्पॉट्स नसलेल्या क्षेत्रांसाठी असतील. या सूचनांमध्ये ग्रामीण भागातील उद्योगांमध्ये काम करणाऱ्या मजूरांना जाण्या-येण्याची परवानगी देण्यात आली आहे. सिंचन प्रकल्प किंवा नूतनीकरणयोग्य उर्जाशी जोडलेल्या ग्रामीण भागात बांधकाम उपक्रमांना सूट देण्यात आली आहे, मजुरीची उपलब्धता असल्यास स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने मुख्य भागात बांधकामांना परवानगी आहे.
हवाई सेवा, रेल्वे सेवा, टॅक्सी, मेट्रो यांसारख्या सर्व सेवा बंद राहणार आहेत. त्याचबरोबर मॉल्स, जीम, जलतरण तलाव, बार, हॉटेल्स 3 मेपर्यंत बंद राहणार आहेत. मुख्य म्हणजे हॉटस्पॉट आणि सील केलेल्या भागांसाठी नवीन नियमावली असेल. ही नियमावली 20 एप्रिलनंतर जारी करण्यात येणार आहे.
संपादन, संकलन-प्रियांका गावडे.