Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

परळीत धनुष्यबाणाच्या टोकावर सेना-भाजपाची युती ठाकरेंच्या स्वागतासाठी गोपीनाथ गडावर युतीचे बोधचिन्ह





परळी:- राज्यातील सत्ता स्थापण्याच्या तिढ्याला बाजुला सारत शेतकर्‍यांचे अश्रू पुसण्यासाठी मराठवाड्यात डेरेदाखल झालेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज गोपीनाथ गडाला भेट देणार असून त्यांचे स्वागत करण्यासाठी स्व. गोपीनाथराव मुंडेंच्या फोटोसमोर कमळ आणि धनुष्यबाणाचे चिन्ह रांगोळीने रेखाटून साहेबांची आठवण असे लिहिले आहे. युतीच्या बोधचिन्हाने ठाकरेंचे स्वागत होत असल्याने उद्धव ठाकरे सत्ता स्थापनेबाबत काय बोलतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
 काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपद सोडायला तयार नाही तर शिवसेनाही मुख्यमंत्री पदावर हट्ट धरून बसली आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीचा निकाल लागून पंधरा दिवस होत असताना अद्याप राज्यात सेना-भाजपाला सरकार स्थापन करता आले नाही. सत्ता स्थापनेचा तिढा बाजुला ठेवत परतीच्या पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकर्‍यांचे अश्रू पुसण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्यात डेरेदाखल झाले आहेत. बीड जिल्ह्यात येताना उद्धव ठाकरे सर्वप्रथम स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या गोपीनाथ गडाला भेट देणार आहेत. त्याठिकाणी स्व. मुंडेंच्या समाधीचे ते दर्शन घेणार आहेत. ठाकरे गोपीनाथ गडावर येणार असल्याने गोपीनाथ गडावर युतीच्या बोधचिन्हाने उद्धव ठाकरेंचं स्वागत केलं जाणार आहे. गोपीनाथ गडावर समाधीस्थळी स्व. मुंडेंचा मोठा फोटो आहे त्यासमोर रांगोळीने कमळ हे भाजपाचं चिन्ह काढण्यात आलं आहे त्याखालीच धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह काढण्यात आले असून त्या दोन्हीच्या मध्ये ‘आठवण साहेबांची’ असे उद्गार लिहिलेले आहेत. यातून स्व. मुंडे हयात असते तर युतीचा तिढा केव्हाच सुटला असता किवा हा तिढाच निर्माण झाला नसता, असे सूचक विधान या बोधचिन्हातून व्यक्त केलं जातय का? या प्रश्‍नासह भारतीय जनता पार्टीमधून ओबीसी नेतृत्व संपुष्टात करण्यात येतय या चर्चेला बळ देण्यासाठी या बोधचिन्हाचा आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीचा संबंध आहे का? ही नवी चर्चा यातून सुरू होत असून उद्धव ठाकरे गोपीनाथ गडावरून काय संदेश देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


शेतकर्‍यांनो घाबरू नका, मी तुमच्या सोबत -उद्धव ठाकरे
लोहा :- राज्यात परतीच्या पावसाने शेतकर्‍यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान केले आहे. ओल्या दुष्काळाने शेत उद्ध्वस्त झाल्याने हवालदिल झालेल्या बळीराजाला धीर देण्यासाठी, त्याला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्यात दौरे करत आहेत. मंगळावारी उद्धव ठाकरे यांनी नांदेडमधील येथील लोहा येथे शेतकर्‍यांन भेट देऊन त्यांची स्थिती जाणून घेतली. शेतकर्‍यांनी घाबरून जाऊ नये, शिवसेना तुमच्यासोबत आहे, असा धीर त्यांनी यावेळी दिला.

यानंतर पावणेबारा वाजता त्यांचा कंधार येथे दौरा होईल. कंधार येथून पुढे अहमदपूर आणि गंगाखेड येथे त्यांचा पाहणी दौरा होणार आहे. दुपारी साडेतीन वाजता उद्धव ठाकरे हे गंगाखेड येथून माजलगावकडे रवाना होणार आहेत. माजलगावनंतर गेवराई येथे जाऊन तेथील शेतांची पाहणी केल्यानंतर सायंकाळी ७ वाजता ते पुन्हा संभाजीनगरला रवाना होतील आणि तेथून नंतर साडेआठच्या सुमारास मुंबईकडे प्रयाण करतील अशी माहिती देण्यात आली आहे. याआधी रविवारी त्यांनी मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतांची पाहणी केली. आता मंगळवारी ते पुन्हा मराठवाड्यात जाऊन बळीराजाच्या व्यथा जाणून घेत आहेत.