परळी :- शहरातील बसवेश्वर कॉलनीमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी चोरीची घटना घडली होती. यात चोरट्यांनी घरातील टी.व्ही. सिलाई मशीन, साडेपाच तोळे सोन्याचे दागिन्यांसह इतर ऐवज लंपास केला होता. या चोरीचा तपास एलसीबीने लावला असून या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले. यात एका सराफाचा समावेश आहे. मुख्य आरोपी अट्टल गुन्हेगार असल्याचे समोर आलेले आहे.
हनुमंत रामकिसन बीडगर (वय ४६ रा. बसवेश्वर कॉलनी) यांच्या घरामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी चोरीची घटना घडली होती. यात चोरट्यांनी घरातील टि.व्ही., सिलाई मशीन, साडेपाच तोळे सोन्याच्या दागिन्यांसह इतर ऐवज चोरून नेला होता. या चोरीचा प्रकरणाचा तपास लागला असून यातील मुख्य आरोपी हनुमंत सावळाराम जोगदंड (रा. वडसावित्री, वय ४०) व घाटनांदूर येथील सोने-चांदीचा व्यापारी बंडु उद्धव दहिवाळ (वय ४०) व अन्य एक अल्पवयीन अशा तिघा जणांना ताब्यात घेण्यात आले. या आरोपींकडून सिलाई मशीन, टी.व्ही. जप्त करण्यात आले असले तरी सोन्याचे दागिने मिळाले नाही. यातील हनुमंत सावळाराम जोगदंड हा अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असून मानवतला त्याने एक खूनही केला असल्याचे समोर आलेले आहे. सदरील चोरीचा तपास एलसीबीचे भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय जोंधळे, भास्कर केेंद्रे, बालासाहेब दराडे, तुळशीराम जगताप, मुंजा कुंवारे यांनी केला आहे.
