Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आष्टीचा तिसरा आमदार उसतोड कामगाराचा मुलगा बनला




आष्टी : अकलूज माळशिरस म्हणजे मोहिते पाटलांचा गड. गेली अनेक वर्षे त्यांनी या भागात सहकार फुलवला. दुष्काळी भागात ऊस लागला. मोहितेंच्या उस कारखान्यांमुळे सुबत्ता आली. तिकडचा शेतकरी सुखी झाला. याच मोहिते पाटलांच्या कारखान्यात ऊस तोडणी कामगाराच्या मुलाने माळशिरसमधून निवडणूक लढवली. त्याचा फॉर्म भरायला स्वत: रणजितसिंह मोहिते पाटील हजर होते. आज तोच उसतोडणी कामगाराचा मुलगा विजयी झाला. तोही आष्टी तालुक्यातील राम सातपुते असे त्याचे नाव.
आष्टी तालुकामध्ये डोईठाण नावाचे गाव आहे. विठ्ठल सातपुते याच गावाचे. परंपरागत चर्मकार व्यवसाय घरात चालत आलेला. पण दुष्काळामुळे पतीपत्नीला उसतोडणी कामगार म्हणून जाव लागायचं. अख्ख गाव ऊस तोडायला म्हणून पश्चिम महाराष्ट्रात यायचं. अखेर सातपुते कुटुंबाने मुक्कामच माळशिरस मधल्या भाम्बुडी येथे हलवला. हे ही गाव तसं दुष्काळी पण जवळच असलेल्या साखर कारखान्यामूळ पोटापाण्याची चिंता मिटलेली. सातपुते यांना तीन मुलींच्या पाठीवर एक मुलगा झाला. नाव ठेवलं राम. गरिबीतून बाहेर पडायचं झालं तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे विठ्ठल सातपुतेना माहित होतं. म्हणूनच त्यांनी आपल्या पोरांना शिकवलं. एकवेळ उपास केला पण मुलाला इंजिनियर करायचं स्वप्न बघितलं. मुलगा ही तसाच हुशार निघाला.
पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रिंटींग इंजिनियरिंगच्या कोर्ससाठी प्रवेश घेतला. सुरुवातीला माळशिरससारख्या ग्रामीण भागात शालेय शिक्षण घेणाऱ्या रामला स्वत: गरिबीतून आल्यामुळे परिस्थितीचे चटके सहन केलेले असल्यामुळे या प्रश्नाची जाण होती. त्याच गांभीर्य समजत होतं. विद्यार्थी लढ्यात काम करत असताना त्याला खरा सूर गवसला. ग्रामीण भागातून आलेल्याच दडपण त्याने झुगारून दिले. मोठ्या सभांमधून आत्मविश्वासाने आपल म्हणण मांडू लागला. सर्व स्तरातून आलेल्या मुलांशी सहजपणे कनेक्ट होण्याची हातोटी त्याला विद्यार्थ्यांचा लढा उभारताना उपयोगाला झाली. पुणे विद्यापीठात त्याने केलेली आंदोलने यशस्वी झाली. बरीच प्रश्ने सोडवता आली. त्याची दखल अभाविपच्या नेतृत्वाने घेतली.

विधानसभेसाठी राखीव मतदारसंघ असणा-या माळशिरस मधून भाजपचे तिकीट कोणाला द्यायचे, हे निश्चित होत नव्हते. मात्र, स्वत: मुख्यमंत्र्यांनी आपल्या विश्वासातील असणा-या या युवा नेत्याला तिकीट देऊन सगळ्यांना धक्का दिला. त्याचा फॉर्म भरण्यासाठी स्वत: विजयसिंह मोहिते पाटील हजर होते. एकेकाळी त्यांच्याच कारखान्यामध्ये आठ वर्ष राम सातपुतेंचे आईवडील ऊसतोडणी कामगार होते. रामच्या उमेदवारीमुळे एक वर्तुळ पूर्ण होतंय. आज ही त्याचे वडील डोईठाण गावात चपला शिवायचे काम करतात. तर त्याच्या आईला जिजाबाई सातपुते यांना आपला मुलगा आमदार होणार म्हणजे काय होणार, हे देखील माहीत नव्हते.