मुंबई: महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर आता गोव्यातही लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना खासदार यांनी केला आहे. राज्यात महाआघाडीची मोट बांधणाऱ्या नेत्यांमध्ये संजय राऊत यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच त्यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना आज सकाळी राऊत यांनी हा दावा केला. 'गोव्यातही भाजपाने अनैतिक पायावर आधारलेले सरकार स्थापन केलेले आहे.
त्यामुळे शिवसेनेचे महाराष्ट्रानंतर आता मिशन गोवा असेल. आताच माझे सुधीर ढवळीकरांशी बोलणं झालं आहे. गोवा फॉरवर्ड ब्लॉकचे प्रमुख विजय सरदेसाईंसह चार आमदार आमच्या संपर्कात आहेत,' असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. गोव्यासह संपूर्ण देशभरातच भारतीय जनता पक्षाविरोधात शिवसेना राळ उठवणार असल्याचेही राऊत यांनी सांगितले. दरम्यान, येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांबाबत मोठा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहितीही संजय राऊत यांनी दिली. दरम्यान, यापूर्वी सकाळी संजय राऊत यांनी एक ट्विटही केले होते, ज्यात म्हटलं होतं की, 'आम्ही बुद्धिबळात अशी कमाल करतो की प्यादीच राजाला मात देतात.' हे ट्विटही त्यांनी भाजपला उद्देशून केल्याचे दिसत आहे.