मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे फुटीर नेते अजित पवार यांनी दिलेल्या बनावट पत्राच्या आधारे त्यांना थेट उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देणारे राज्यपाल यांच्या भूमिकेवर शिवसेनेनं कडाडून टीका केली आहे. 'एक भगतसिंह देशासाठी फासावर गेले, तर दुसऱ्या भगतसिंहांच्या सही-शिक्क्याने रात्रीच्या अंधारात लोकशाही व स्वातंत्र्यास वधस्तंभावर चढवले,' असा घणाघात शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी केला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून उद्धव यांनी सध्याच्या घडामोडींवर भाष्य करताना राज्यपाल कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून १६२ आमदारांचे पत्र राजभवनात सादर केलेय. हे सर्व आमदार राज्यपालांपुढं उभे राहायला तयार आहेत. इतकं चित्र स्पष्ट असताना राज्यपालांनी कोणत्या बहुमताच्या आधारावर फडणवीस यांना शपथ दिली, असा प्रश्न उद्धव यांनी उपस्थित केला आहे. उद्धव यांनी अजित पवारांवरही टीका केली आहे. सत्याचा विजय होणारच आहे. काळजी नसावी, असंही उद्धव यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे म्हणतात... >> महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा व प्रतिष्ठेचा बाजार सत्तांधांनी मांडला आहे. महाराष्ट्राशी ज्यांचे भावनिक नाते नाही तेच हे अशी लक्तरे काढू शकतात. >> महाराष्ट्रात जे काही घडले त्यात कसलीही चाणक्य-चतुराई किंवा 'कोश्यारीसाहेबांची होशियारी' नाही. आमदारांचे अपहण करून त्यांना दुसऱ्या राज्यांत डांबून ठेवणे यात कसली आलीय चाणक्य नीती? >> शरद पवारांचे पुतणे म्हणून अजित पवार मिरवत असतील तर त्यांनी आधी बारामतीच्या आमदारकीचा राजीनामा देऊन स्वत:चे राजकारण करायला हवे होते. पण काकांनी जे कमावले तेच चोरून 'मीच नेता, माझाच पक्ष' असं सांगणं हा वेडेपणाचा कळस आहे. >> कालपर्यंत अजित पवार खोटं बोलत नाही असं सांगणारे हेच अजित पवार आता रोज खोटं बोलत आहेत. मुळात राज्यपालांनाच त्यांनी खोटं पत्र दिलं आहे. सत्तास्थापना कोणीही करावी. पण लोकशाही संस्थावरील लोकांचा विश्वासच उडून जावा इतक्या थराला जाऊ नये. >> फडणवीस यांच्याकडं बहुमत होतं तर बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 'ऑपरेशन लोटस'च्या नावाखाली नव्या चांडाळ चौकडीची नियुक्ती का केली? पैशाच्या बॅगा घेऊन ही चौकडी फिरत आहे. हे थैलीशाहीचं राजकारण आहे. संघाचे स्वयंसेवक म्हणवणाऱ्यांवर ही वेळ का यावी? >> गडकरी हे एक शहाणे राजकारणी आहेत असा समज होता. तोही गैरसमज ठरला. क्रिकेटच्या खेळाची उपमा त्यांनी या सर्व प्रकारास दिली. पण कितीही फिक्सिंग झाले तरी 'सत्यमेव जयते'चा पराभव होणार नाही.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2pMDbqq
via IFTTT