बीड :- राजकारणात कुणी कोणाचा कायमचा शत्रु नसतो, परस्थिती नुसार राजकारणात बदल होत असतात. काल एका पक्षात असलेले कदाचीत उद्या वेगळ्या पक्षात ही असू शकतात. एखादा उमेदवार निवडणुकीत पडला की, त्याचं खापर याच्यावर, त्याच्यावर फोडलं जात असतं, पण आपण कुठं कमी पडलोत याचा विचार पडलेला उमेदवार करत नाही. भीमराव धोंडे हे आष्टीतून पडले, आपण धसांमुळेच पडलो आहोत असा टाहो त्यानी फोडण्यास सुरुवात केली. गेल्या वेळी धोंडे धसांचा पराभव करुन जिंकले होते, धसांना पाडून जिंकणं तसं सोपी गोष्ट नाही, मात्र धोंडे यांनी धसांचा पराभव केला होता. तेच धोंडे आता मला धसांनी पाडल्याचा डांगोरा पिटतात म्हणजे, कमालच म्हणावी लागेल. धसांनी पाडल्याचा जो आरोप धोंडे करतात, त्यांचा आरोप म्हणजे आपला पाच वर्षातील नाकर्तेपणाच म्हणावा लागेल. लोकांनी आपल्याला का नाकारलं याचा विचार धोंडे का करत नाही. कुणी किती ही विरोध केला तरी ज्याच्या बद्दल जनतेत आस्था आहे, तो उमेदवार निवडून येतोच, याने पाडलं त्याने पाडले म्हणण्यात काही अर्थ नसतो. आपल्या राजकारणातील दोष शोधायचे असतात. राजकीय कुरघोड्या नव्या नाहीत. त्या सगळ्याच पक्षात असतात. एकुणच राजकारण न समजण्या इतके धोंडे दुधखुळे नाहीत.
२०१४ साली भाजपाच्या तिकीटावर भीमराव धोंडे लढले. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून सुरेश धस होते, धस यांचा धोंडे यांनी पराभव केला. त्यानंतर जि.प. निवडणुकीत सुरेध धस यांची महत्वाची भुमिका राहिली. राष्ट्रवादीच्या ताब्यात जाणारी जि.प. धसांनी भाजपाच्या ताब्यात आणुन दिल्याने धस भाजपासाठी हिरो ठरले होते, जि.प. भाजपाच्या ताब्यात दिली तेव्हा धस हे भाजपात जाणार हे समजून आलं होतं. धसांची कामगिरी पाहता. पंकजाताई मुंडे यांनी धसांना लातुर, उस्मानाबाद, बीड स्थानिक स्वराज्य निवडणुकीतून उमेदवारी दिली. धस निवडून आले. धस भाजपात आल्याने धोंडेंची पंचाईत झाली. धोंडे यांचं काय होईल असं बोललं जात होतं. धोंडे यांना भाजपाने यावेळी निवडणुकीचे तिकीट दिले, धोंडे यांना उमेदवारी नको म्हणुन भाजपाच्या एका गटाचा विरोध होता. त्या विरोधाचे पडसाद निकालातून उमटले, आता धोंडे हे धसांच्या नावाने खडे फोडू लागले. धस यांनीच मला पाडल्याचा आरोप करु लागले. धोंडे हे गेल्यावेळी धसांना पाडून विजयी झाले होते, तेच धोंडे आज धसांवर आरोप करु लागले म्हणजे आश्चर्यच म्हणावं लागेल. आपण का पडलोत? आपली यंत्रणा कुठं कमी पडली. लोकांनी आपल्याला का नाकारलं याचं आत्मचितंन धोंडे यांनी करायला हवं. राजकारण म्हटलं की, त्यात कुरघोड्या आल्याच, मग त्या कोणत्या ही पक्षात आहे. पक्षातील विरोधकांनी कितीही पाडण्याचा प्रयत्न केला तरी लोकांच्या मनात असेल तर पक्षातील विरोधकामुळे काहीच फरक पडत नसतो. गेल्या पाच वर्षात धोंडे यांची मतदार संघात काय कामगिरी आहे? एखाद वेळसे लोकांना धोंडे यांचं काम आवडलं नसेल, त्यामुळे त्यांचा पराभव झाला असेल. धोंडे हे राजकारणातील ज्येेष्ठ नेते आहेत. राजकारण कशा पध्दतीचं चालतं हे त्यांना सांगण्याची गरज नाही. धोंडे यांचा प्रवास या पक्षातून त्या पक्षात झालेला आहे. तसाच धसांचा ही झालेला आहे. त्यामुळे कोण निष्ठावंत आहे हे आज तरी सांगण्याची गरज नाही. राज्यात अनेक दिग्गज पडले, ज्यांची गॅरंटी वाटत नव्हती, ती मंडळी निवडून आली, त्यामुळे एका पराभवाने धोंडे इतके उदिग्न झाले की, त्यांनी आकाश पातळ एक केलं. ज्यांना राजकारण समजलं ती मंडळी पराभवाने खचत नाही, उलट पुढच्या दिशेने अधिक जोमाने कामाला लागत असते.
बीडमध्ये असचं झालं होतं
२००४ साली जयदत्त क्षीरसागर हे चौसाळा मतदार संघातून पराभूत झाले होते, आपला पराभव विनायक मेटे यांच्यामुळेच झाला, असा डांगोरा क्षीरसागर हे अनेक महिने पिटत होते, मेटे, क्षीरसागर याचं भांडण हे अगदी राज्य पातळीपर्यंत गेलं होतं, पुढे राजकारण बदलत गेलं. २०१४ साली बीडमधून जयदत्त क्षीरसागर आणि विनायक मेटे हे आमने-सामने आले, त्यात मेटे यांचा अल्पमतांनी पराभव होवून क्षीरसागर विजयी झाले. आताच्या निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर हे शिवसेनेच्या तिकीटावर निवडणुक लढले. मेटे भाजपाचे घटक असल्याने क्षीरसागर यांना मेटे यांची मदत घ्यावी लागली. राजकारण कसं बदलत असतं याचं हे जिवंत उदाहारण आहे. राजकारणात कधीच एक बाजु नसते, हे मेटे, क्षीरसागर यांच्या जवळकीतून दिसून आलं.
आपल्या गावामधील बातम्या दया ILOVEBEED वर
वेबसाइट वर जउन Submit बटनावर क्लिक करुण पठावा अन्यथा ईमेल पठावा
Ilovebeed2019@gmail.com वर