बीड :- पेट्रोल पंपावर नव्याने उभारण्यात आलेल्या ऑटो मशीनच्या पाईपमध्ये दुसरा छोटा पाईप टाकून अज्ञात चोरट्यांनी पंपाच्या टाकीमधील तब्बल ३४०० ते ३५०० लिटर डिझेल चोरून नेल्याची घटना रात्री साडेबारा वाजण्याच्या दरम्यान बीड -परळी रस्त्यावरील जरुड फाट्यावर घडली. चोरट्यांनी मोठ्या शिताफीने डिझेलची चोरी केली आहे. सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झाले आहेत. मात्र रात्रीच्या अंधारामुळे या चोरट्यांचे चेहरे अंधूक दिसतात. सदरचा पेट्रोल पंप हा सुधीर काकडे यांचा आहे.
बीड - परळी रस्त्यावरील शहरापासून काही अंतरावर असलेल्या जरुड फाटा येथे सुधीर काकडे यांचा भैरोनाथ केएसके पेट्रोलियम या नावाचा पंप आहे. रात्री साडे बारा ते पावणे एकच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या पंपावर डिझेलची चोरी केली. पेट्रोल पंपावर नव्याने ऑनलाईनसाठी ऑटो मशीन उभारण्यात आल्या आहेत. चोरट्यांनी या मशीनच्या पाईपास छिद्र पाडून त्यामध्ये छोटा पाईप लावला. पंपापासून तब्बल अर्धा कि.मी. अंतरापर्यंत जनरेटर अथवा अन्य साहित्याने मोटार लावून पेट्रोल पंपाच्या टाकीतील तब्बल ३४०० ते ३५०० लिटर डिझेल चोरून नेले. हा खटाटोप करताना अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डिझेल सांडले आहे. चोरट्यांनी आता पेट्रोल पंपांना लक्ष्य केल्याने चालकात खळबळ उडाली असून या प्रकरणाची तक्रार पोलिसात देणे चालू होते. चोरट्यांनी तब्बल २ लाखांपेक्षा जास्त रुपयांचे डिझेल चोरून नेले आहे.
