धारूर :- पाच वर्षांपूर्वी भारतीय सैन्य दलात भरती झालेल्या २५ वर्षीय जवानाला रात्री युद्धाचा सराव करताना वीर मरण आले. सदरील हा सराव राजस्थान येथे सुरू होता. या घटनेची माहिती धारूर तालुक्यात होताच धारूर तालुक्यात शोककळा पसरली. हा जवान मूळचा घागरवाडा येथील होता. उद्या शासकीय इतमामात दुपारी चार ते पाच या दरम्यान जवानाच्या पार्थीवदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
परमेश्वर बालासाहेब जाधवर (वय २५) हा तरुण गेल्या पाच वर्षांपूर्वी भारतीय सैन्य दलामध्ये भरती झाला होता. राजस्थान येथे जवानाचा युद्ध सराव असल्याने यामध्ये परमेश्वर जाधवर याचाही सहभाग होता. युद्धाचा सराव करत असताना रात्री त्याला वीर मरण आले. या घटनेची माहिती सैन्य दलाच्या वतीने त्याच्या घरच्या लोकांना कळवण्यात आल्यानंतर घागरवाड्यासह धारूर तालुक्यावर शोककळा पसरली. परमेश्वर जाधवर या जवानाचे गेल्या तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याला दीड वर्षाची मुलगी आहे. जाधवर यांच्या आई-वडिलांनी त्यांना मोठ्या कष्टाने शिक्षण दिले होते. त्यांचे आई-वडिल ऊसतोड मजूर आहेत. या घटनेने जादवर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. उद्या दुपारी चार ते पाच या दरम्यान परमेश्वर जाधवर यांच्या पार्थीवावर घागरवाडा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या जवानाच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, दीड वर्षाची मुलगी, तीन भाऊ असा मोठा परिवार आहे.
