परळी/सिरसाळा:- माणुसकीला काळीमा फासणारी माजलगाव शहरातील घटना रात्री उघडकीस येत नाही तोच आज परळी तालुक्यामध्ये खुनाचा प्रकार उघडकीस आला आहे. स्कॉर्पिओच्या चालकावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याचा खून करून मृतदेह गाडीतच ठेवण्यात आला. काही लोकांना रस्त्याच्या कडेला स्कॉर्पिओ आढळून आली. याची माहिती पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता स्कॉर्पिओमध्ये त्यांना मृतदेह आढळून आला. चालकाचा खून कोणी केला असावा? याचा तपास परळी ग्रामीण पोलिस करत आहे. या घटनेने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
परळी तालुक्यातील कावळ्याचीवाडी-म्हातारगाव रोडवर रस्त्याच्या बाजुला स्कॉर्पिओ (क्र. एम.एच. २४ व्ही. ५१४८) ही उभी होती. शेतात जाणार्या लोकांना ही गाडी दिसून आल्यानंतर या गाडीत कोणीच नसल्याने काही लोकांनी शंका व्यक्त केली. गाडीच्या पाठीमागच्या सिटवर रक्ताचे डाग आढळून आल्यानंतर पोलिस प्रशासनाला सदरील गाडीबाबत माहिती कळविण्यात आली असता पोलिस उपअधीक्षक राहुल धस व परळी ग्रामीणचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. गाडीचे दार उघडून बघितले असता आतमध्ये गाडीचा चालक विजय सखाराम यमगर (वय ३०, रा. दगडवाडी ता. परळी) याचा मृतदेह आढळून आला. डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेने परळी तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. सदरील चालकाचा कोणी खून केला असावा या बाबतचा तपास परळीचे पोलिस करत आहेत. काल माजलगाव शहरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली नाही तोच आज पुन्हा एका खुनाची घटना उघडकीस आल्याने जिल्ह्यामध्ये खुनाची मालिका सुरू असल्याचे दिसून येत आहे.
(रिपोर्टर)
live.beedreporter.net
