बीड :- स्व. गोपीनाथराव मुंडे हे इ.स. २०११-१२ साली पक्षामध्ये अस्वस्थ होते. गोपीनाथ मुंडेंना पक्षाबाहेर काढण्याचा भाजपामध्ये डाव चालू होता, असे एक ना अनेक गौप्यस्फोट करत धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी भाजपात पंकजा मुंडेंना डावलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगत भाजपा ओबीसी नेत्यांना मोठं होऊ देत नाही, असं जळजळीत कडवं सत्यही शेंडगेंनी मराठी दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलून दाखवलं. परळीत पंकजांना पाडण्यासाठी आप्तस्वकियांनी मदत केल्याचे सांगत चिक्की घोटाळ्याचे कागदपत्रही भाजपातीलच काही लोकांनी विरोधकांच्या हातात दिल्याचे म्हटले.
गेल्या चार दिवसांपासून राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या चर्चेत आहेत. फेसबुकच्या एका पोस्टवरून चर्चा सुरू झाल्यानंतर काल स्वत: प्रसिद्धी माध्यमासमोर येत पंकजा मुंडेंनी आपण भाजप सोडणार नाही हे स्पष्ट केले आणि चर्चेला पूर्णविराम मिळाला. मात्र आज एबीपी माझा या मराठी दूरचित्रवाहिनीशी बोलताना धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी भाजपावर हल्लाबोल केला. भाजपामध्ये ओबीसी नेत्यांना मोठं होऊ दिलं जात नसल्याचे त्यांनी सांगितले. मुंडे, खडसे, बावनकुळे, तावडे यांना भाजपाने राजकीयदृष्ट्या संपवल्याचा आरोप शेंडगे यांनी केला. भाजपाला ओबीसी नेते नको आहेत. २०११-१२ साली स्व. गोपीनाथराव मुंडे हे प्रचंड अस्वस्थ होते, गोपीनाथ मुंडेंना पक्षाबाहेर काढण्याचा डाव भाजपातच आखला जात होता. मुंडे साहेब बाहेर निघाले होते, त्यावेळी आम्हीही त्यांना भाजप सोडू नका म्हणून सांगितलं होतं. आता पंकजा मुंडेंना भाजपात डावलण्याचा प्रयत्न होतोय, मागच्या सरकारमध्ये पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय झाला आहे. आजही पंकजा मुंडेंना साईडलाईन केलं जातय. एवढच नव्हे तर परळी विधानसभा मतदारसंघात पंकजांना पाडण्यासाठी आप्तस्वकियांचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला. चिक्कीचे कागदपत्र विरोधकांकडे कोणी दिले असा सवाल करत भाजप ओबीसींच्या बाबतीत सकारात्मक दृष्टीकोन ठेवत नसल्याचा आरोप प्रकाश शेंडगेंनी केला.
