दिल्ली (वृत्तसेवा):- दिल्लीतील धान्य बाजार परिसरात असलेल्या कारखान्यांना लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, या आगीत अनेक जण जखमी झाले असून त्यांना तातडीने एलएनजेपी, हिंदू राव आणि आरएमएल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ३० बंब घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळाले असून बचाव कार्य अजूनही सुरूच आहे.
दिल्लीतील धान्य बाजार परिसरात ही आज (रविवार) पहाटे ५.२२ च्या सुमाराला लागली. ही माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या आगीत आतापर्यंत ४३ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिल्ली अग्निशमन दलाचे प्रमुख अतुल गर्ग यांनी दिलीय. आगीची माहिती मिळताच गर्गही घटनास्थळी दाखल झाले. पहाटे लागलेली ही आग आता पूर्णपणे विझली असल्याची माहिती दिल्ली उप अग्निशमन दल प्रमुख सुनील चौधरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. बचावकार्य सुरू असून या कामाला ३० अग्निशमन दलाचे बंब कार्यरत असल्याची माहिती चौधरी यांनी दिली. घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान मोठ्या संख्येने उपस्थित असून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. आग आटोक्यात आली असली तरी इमारतीच्या खिडक्यांमधून काळा धूर निघत आहे. या मुळे आत आग सुरू असल्याचे सांगितले जात आहे. आगीचे कारण समजू शकले नाही.
राष्ट्रपती, पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख
नवी दिल्ली: आज (रविवारी) पहाटे दिल्लीतील धान्य बाजार परिसरातील कारखान्यांमध्ये लागलेल्या भीषण आगीत ४३ लोक ठार झाले आहेत. या घटनेने लोक हादरले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट करत दु:ख व्यक्त केले आहे. दिल्लीच्या धान्यबाजारात लागलेल्या आगीची दुखद बातमी ऐकून मला फार वाईट वाटले. बाधित कुटुंबांसाठी मी प्रार्थना करतो. जखमींनी लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे. लोकांचे संरक्षण करण्यासाठी स्थानिक प्राधिकरण चांगले काम करीत आहे, असे राष्ट्रपतींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या भीषण घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. दिल्लीतील राणी झांसी रोडवरील धान्य बाजारात लागणारी आग अत्यंत भीतीदायक आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्याबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. जखमींनी लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे. प्राधिकरण घटनास्थळावर सर्व शक्य सहाय्य करीत आहे, असे पंतप्रधांनी म्हटले आहे.
