Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

'तरुण भारत'मधून सवाल; मुंडे, रोहिणी खडसे निवडून आल्या असत्या तर...



मुंबईः एकनाथ खडसे यांची मुलगी व पंकजा मुंडे निवडून आल्या असत्या आणि एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले असते, तर मग भाजपा बहुजनांचा पक्ष झाला असता का? आता यापैकी काहीच नाही, तर तो एकदम 'मूठभर' लोकांचा झाला का?, असा सवाल करत नागपूर तरुण भारतच्या अग्रलेखातून पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या गोपीनाथ गडावरील कार्यकर्ता मेळाव्यात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या भाषणावरून हे दोघेही जण पक्षावर नाराज असल्याचे दिसून आले. नागपूर तरुण भारत वृत्तपत्राच्या अग्रलेखातून या दोघांच्या भाषणाचा समाचार घेण्यात आला आहे.

बहुजनवाद काढलाच

पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे या दोघांनीही बहुजनवाद काढलाच. हे असले वाद, आपली रडकथा प्रभावी करण्यासाठी फारच उपयुक्त असतात. एकनाथ खडसे यांची मुलगी व पंकजा मुंडे निवडून आल्या असत्या आणि एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले असते, तर मग भाजपा बहुजनांचा पक्ष झाला असता का? आता यापैकी काहीच नाही, तर तो एकदम 'मूठभर' लोकांचा झाला का?, अशी विचारणा अग्रलेखातून करण्यात आली आहे. वस्तुस्थिती ही आहे की, या दोघांनाही विस्थापित करणारे जे नेतृत्व उभे झाले आहे तेही बहुजन समाजाचेच आहे, हे यांच्या लक्षातच येत नाही. काळ वेगाने बदलत आहे. मतदारांची मानसिकता, आशा-अपेक्षा खूप बदलत चालल्या आहेत. याची जाण या दोघांनाही नाही, असेच दिसून येते. काळाची ही बदलती पावले यांनी ओळखली नाही, म्हणून त्यांची ही अशी अवस्था झाली आहे, असे यात म्हटले आहे.दोघांची वक्तव्ये राजकीयदृष्ट्या अयोग्य!

आपण कुणाला काय दिले, कुणासाठी काय काय केले, हे आपण आपल्या तोंडाने सांगायचे नसते, अगदी राजकारणातही. उलट, ते लोकांना सांगावेसे वाटले पाहिजे आणि आपण, पक्षाने मला किती दिले, याचीच सतत जाहीर उजळणी करायची असते. हा विधिनिषेध सर्वसामान्य कार्यकर्त्याने पाळला नाही तर एकवेळ चालून जाते. परंतु, जेव्हा आपण स्वत:ला 'लोकांच्या मनातील मुख्यमंत्री' असे नामाभिधान लावून घेतो किंवा 'मुंडेसाहेब असते तर मीच मुख्यमंत्री झालो असतो' असे आत्ममुग्ध विधान करतो, तेव्हा तर हा विधिनिषेध कटाक्षाने पाळायचा असतो. अगदी आजच्या प्रचलित भाषेत बोलायचे, तर या मेळाव्यात पंकजा मुंडे व नाथाभाऊ जे काही बोलले, ते 'पोलिटिकली इन्करेक्ट' (राजकीयदृष्ट्या अयोग्य) असेच होते, असेही यात म्हटले आहे.