माजलगाव :- गेल्या आठ दिवसांपासून माजलगाव तालुक्यात दमदार पाऊस पडल्याने शेतकर्यांच्या शेतातील कापूस, बाजरी, मका, ज्वारी, सोयाबीन हे खरीप हंगामातल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याची गंभीर दखल नवनिर्वाचित आमदार प्रकाश सोळंके यांनी घेत शेतकर्यांच्या पिकांचे पंचनामे करून त्यांना तात्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी आमदार सोळंकेंच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकार्यांकडे निवेदन देऊन केली तर आ. सोळंकेंनी जिल्हाधिकार्यांसोबत भ्रमणध्वनीवरून संभाषण करत तालुक्यातील शेतकर्यांच्या शेतातील पिकांची वस्तूस्थिती सांगत शेतकर्यांची परिस्थिती गंभीर आहे, पिकांचे पंचनामे करत त्यांना तात्काळ मदत दिली गेली पाहिजे, अशा सूचना दिल्या. जिल्हा प्रशासनानेही नवनिर्वाचित आमदारांच्या या मागण्यांची आणि सूचनांची गंभीर दखल घेत कार्यवाही सुरू केली आहे. नवनिर्वाचित आमदार प्रकाश सोळंके यांनी आज अस्तिककुमार पाण्डेय यांच्याशी भ्रमणध्वनीवरूएन संपर्क साधत माजलगाव तालुक्यासह मतदारसंघातील शेतकर्यांच्या शेतातील पिकांची माहिती देत पावसामुळे पिके कसे उद्ध्वस्त झाले हे सांगितले.
त्याचबरोबर शेतकर्यांना मदत देण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचनाही दिल्या. मागील १५ ते २० दिवसांपासून सतत पाउसजास्त प्रमाणत झाल्यामुळे वरील पिकांचे नुकसान झालेले आहे. कडधान्य पिके काढणीला आले असतांना अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचुन उभे पिक नासुन गेले आहे तर वेचणीला आलेला कापूस खराब हावुन कोंब फुटत आहेत. यामुळे हातचे आलेले पिक डोळ्यादेखत निस्तनाबुत झाले आहे. अशा परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यामुळे माजलगांव विधानसभा मतदारसंघातील समाविष्ठ माजलगांव, धारूर व वडवणी या तालुक्यातील शेतीचे पंचनामे करून शेतक-यांना मदत करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देखिल देण्यात आला आहे. यावेळी मनोहर डाके, विश्वांभर थावरे, ऍड. भानुदास डक, पंचायत समितीचे सभापती जयदत्त नरवडे, तालुकाध्यक्ष रमेश सोळंके, जि. प. सदस्य कल्याण आबुज, डॉ. उध्दव नाईकनवरे, भगवान कदम, नवाब पटेल,बालासाहेब जोगडे, शिवप्रसाद खेत्री, सतिष काकडे, रमेश सौंदरमल यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
