बीड : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा १४ दिवसानंतर घेतलेला स्वॅब निगेटिव्ह आला असून जिल्ह्याची पुन्हा एकदा ग्रीनझोन कडे वाटचाल सुरू आहे. जिल्ह्यातील रुग्ण संख्या पुन्हा एकदा शून्यावर आल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी यासाठी जिल्ह्यातील सर्व बहाद्दर आणि तितक्याच संयमी जिल्हावासीयांचे कौतुक केले आहे.
धनंजय मुंडे यांनी त्यांच्या फेबुकवरून पोस्ट करत जिल्ह्यावसीयांचे त्याचबरोबर प्रशासनातील अधिकारी - कर्मचारी इत्यादी सर्व घटकांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे, असे आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे. बीड जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या सर्व स्वॅब टेस्ट निगेटिव्ह आल्या असून, आष्टी तालुक्यातील एकमात्र पॉझिटिव्ह रुग्णाच्या यशस्वी लढ्यानंतर बीडचा शून्य हा आकडा कायम राखण्यात यंत्रणांना यश आले आहे.
यावर ना. मुंडेंनी समाधान व्यक्त केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २५ हजार च्या आसपास ऊसतोड मजूर विविध कारखान्यांवरून परतले असून विविध खबरदारीच्या उपाययोजनांसह आवश्यक वैद्यकीय तपासणी करून त्यांना जिल्ह्यात प्रवेश दिला जात आहे. तसेच त्यांना गावातही विविध प्रकारची खबरदारी घेण्याबाबत नियमावली आखून देण्यात आलेली आहे. कोरोनाविरुद्धचा लढा आता निर्णायक टप्प्यात असून, जिल्ह्यातील हा शून्याचा आकडा टिकवून ठेवण्याची जबाबदारी पुन्हा एकदा जिल्हा वासीयांची आहे. इतके दिवस जसे संयमाने लॉकडाऊन पाळले तसेच पुढील काही दिवस पाळावे, शेवटच्या टप्प्यात येऊन कोणतीही चूक होऊ द्यायची नाही, त्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन पुन्हा एकदा ना. धनंजय मुंडे यांनी केले आहे.
