अहमदनगर: ‘करोनाविरूद्धच्या लढ्यात आपण सगळे एकजुटीने पुढे जात आहोत. अशावेळी नकारात्मक सल्ले ऐकण्यापेक्षा सकारात्मक पावले टाका. त्यासाठी सर्वपक्षीय उच्चाधिकार समिती स्थापन करावी,’ असा सल्ला माजी मंत्री, भाजपचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राज्य सरकारला दिला. विखे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री कार्यालयाला ही सूचना केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘आज करोनाच्या कठीण काळामध्ये राज्य सरकारने सर्वपक्षीय उच्चाधिकार समिती स्थापन केली पाहिजे. त्यामुळे या परिस्थितीशी सामना करण्यास मदत होईल. तसेच या लढ्यात आपण सगळे एकजुटीने पुढे जात आहोत म्हणून नकारात्मक सल्ले ऐकण्यापेक्षा सकारात्मक पावले टाकावीत.' 'राज्य सरकारने विविध क्षेत्रांतील अनुभवी लोकांचा समावेश असलेली सर्वपक्षीय उच्चाधिकार समिती स्थापन करावी. या संकटात राज्य अधिक भरडला जात आहे.
