Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

हरिश्चंद्रगड




हा किल्ला पुणे, ठाणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. पुणे, ठाणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमा जेथे एकत्र येतात तेथून सह्याद्रीची एक उपरांग पूर्वेकडे धावते. ही रांग हरिश्चंद्राची रांग म्हणून ओळखली जाते. या भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या रांगेच्या सुरुवातीलाच हरिश्चंद्रगड हा किल्ला आहे.
हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास अशी येथील शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे. हरिश्चंद्रगडावरील लेण्यांत चांगदेवांनी तपश्चर्या केली होती.
सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर असलेला हरिश्चंद्रगड समुद्रसपाटीपासून १४२४ मीटर उंच आहे. गडावर जाण्यासाठी तीन चार वाटा सध्या प्रचलित आहेत.
खिरेश्वरकडील वाट सोपी असल्याने तिचा मोठया प्रमाणावर वापर केला जातो. राष्ट्रीय महामार्ग २२२ असा राजरस्ता माळशेज घाटातून जातो. या घाटाच्या माथ्यावरखुबीफाटा आहे. या खुबीफाट्यावरुन खिरेश्वरला जाता येते. तसेच पुण्याकडून खिरेश्वरपर्यंत एस.टी. बसेसचीही सोय आहे. खुबीफाट्यावरून खिरेश्वरकडे निघाल्यावर वाटेत आश्रमशाळा आहे. अडचणीच्या वेळेस येथे विनंतीवरून मुक्कामाची सोय होऊ शकते. याच वाटेच्या बाजूला प्राचीन मंदिरही आहे.

हरिश्चंद्रगडाचा माथा अतिशय विस्तीर्ण असल्यामुळे तो खालून एकदम भव्य दिसतो. त्याच्या पूर्व बाजूला इंग्रजी यू आकाराची खिंड आहे. ही खिंड म्हणजे प्रसिद्ध तोलार खिंड होय. ही खिंड पुणे आणि नगर जिल्ह्यांमधील दुवा आहे.
पायथ्यापासून तोलार खिंडीत पोहोचेपर्यंत तास दीडतास लागतो. वाटेत कोठेही पाणी नाही. त्यामुळे येतानाच पाण्याच्या बाटल्या सोबत बाळगाव्या लागतात. हा सर्व परिसर जंगलाचा आहे. या भागात वाघाचा वावरही असतो असे सुचविणारे एक वाघाचे शिल्प असलेला दगड तोलार खिंडीत उभा केलेला आहे. खिंडीतून पुढे वाट कोथळ्याकडे जाते. खिंडीच्या पश्चिमेकडे कड्यावर चढणारी वाट आपल्याला हरिश्चंद्रच्या माथ्यावर घेऊन जाते. खिंडीतून चढणार्‍या वाटेवर खडकात पायठण्या खोदलेल्या आहेत. येथून अर्ध्या तासातच आपण तटबंदीच्या आत पोहोचतो.
येथून पश्चिमेकडे धोपटमार्गाने ३-४ कि. मी. चालत जावे लागते. या मार्गावर बर्‍याच ठिकाणी दिशादर्शक बाणही रंगवलेले आहेत. या मार्गाने आपण तारामती शिखराच्या पदरात पोहोचतो.
येथेच हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे. तारामती शिखराच्या उत्तर पायथ्याला लेणी कोरलेली आहे.
हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या. मंदिराच्या समोर नंदी आहे. साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर आहे. मंदिरावर कोरीव गुहा आहे.


गणपती,हरिश्चंद्रेश्वर मंदिर
मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली धळ आहे. या धळीमध्ये केदारेश्वराची लेणी आहे. यामध्ये भलीमोठी पिंड आहे. पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते.प्रदक्षिणा मारता येते.

कोंकणकडा
हरिश्चंद्रगडाचे सर्वांत जास्त आकर्षक ठिकाण म्हणजे पश्चिमेकडे असलेला कडा. हा कडा कोकण कडा म्हणून ओळावला जातो. तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा हा कडा मध्यभागी जवळजवळ ७५ फूट अंतर्वक्र आहे. कड्याच्या माथ्यावर झोपूनच (आणि जपूनच) याचे विराट रूप पहावे लागते. स्वच्छ हवा असली तर येथून कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो.
हरिश्चंद्रगडावरून शिवनेरी, हडसर, चावंड, निमगिरी, सिंदोळा,जीवधन, गोरखगड, मच्छिंद्र, सिद्धगड, माहुली,कलाडगड,भैरवगड, (मोरोशी), तसेच भैरवगड (शिरपुंजे), कुंजरगड असे किल्ले दिसतात.
महाराष्ट्रातील इतर पारंपरिक किल्ल्यांपासून हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही. या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत, तसेच साधारणपणे १२व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिर आहे. सह्याद्रीतील अंत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे.
गडपणाच्या खाणाखुणा लोप पावत असल्यातरी निसर्गाची मुक्त उधळण, त्याचे रौद्रत्व, निसर्गाचे वेगवेगळे आविष्कार आपल्याला हरिश्चंद्राच्या भटकंतीमध्ये पहायला मिळतात. मात्र हे सर्व पहाण्यासाठी, अनुभवण्यासाठी आपण किमान दोन दिवसांची सवड हाताशी ठेवणे गरजेचे आहे. कोकणकड्यावर १८३५ मध्ये कर्नल साईक्सला इंद्रवज्र दिसले होते.
१७४७-४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली
मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच 'मंगळगंगेचा उगम' असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणाया गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथर्‍यात जमिनीखाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत 'चांगदेव ऋषींनी' चौदाशे वर्ष तप केले होते असे स्थानिक गावकरी सांगतात.
'शके चौतिसे बारा । परिधावी संवत्सरा ।
मार्गशिर तीज (तेरज) रविवार । नाम संख्य ॥
हरिश्चंद्रनाम पर्वतु । तेथ महादेव भक्तु ।
सुरसिध्द गणी विरुयातु । सेविजे जो ॥ हरिश्चंद्र देवता ॥
मंगळगंगा सरिता । सर्वतीर्थ पुरविता सप्तस्थान ।
ब्रम्हस्थळ ब्रम्ह न संडीतु । चंचळ वृक्षु अनंतु । लिंगी जगन्नाथु । महादेओ ॥
जोतीर्थासि तीर्थ । केदारांसि तुकिनाति । आणि क्षेत्री निर्मातिबंधु हा॥'
हे चांगदेवाविषयीचे लेख मंदिराच्या प्राकारात, खांबांवर व भिंतींवर आढळतात. येथे तपश्चर्या करून झाल्यावर श्री चांगदेवांनी तत्त्वसार नावाचा ग्रंथ लिहिला.


कोकणकडा
या किल्ल्याचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे येथील कोकणकडा. ३००० फुटांपेक्षाही उंच असा हा कडा महाराष्ट्रातील सर्वांत उंच कडा म्हणून ओळखला जातो. हा कडा इंग्रजीतील यु 'U' आकाराचा आहे. हा इतर कड्यांसारखा ९० अंशात नसुन बाह्य गोल आकाराचा आहे. समोरुन बघितला तर नागाच्या फण्यासारखा हा कडा दिसतो.