कोरोना विषाणूच्या संसर्गाने थैमान घातलं आहे. त्यामुळे जगभरात काही ठिकाणी पूर्णतः तर काही ठिकाणी अंशतः लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कोट्यावधी नागरिक घरात बंद आहेत. अशावेळी WhatsAppवरील फेक न्यूजचंही प्रमाण वाढत असल्याचं समोर येत आहे. कोरोनाविषयीच्या अनेक खोट्या बातम्या किंवा इतर स्वरुपातील माहिती फॉरवर्ड होण्याचं प्रमाण वाढलं. याचं गांभीर्य लक्षात घेऊन WhatsAppने यासाठी मोठा निर्णय घेतला आहे (WhatsApp on Corona Fake News). यानुसार यापुढे WhatsApp वापरकर्त्यांना एक मेसेज केवळ एकदाच फॉरवर्ड करता येणार आहे. याआधी चुकीच्या माहितीच्या मेसेजवर आळा घालण्यासाठी WhatsAppने केवळ 5 वेळा फॉरवर्डचा नियम केला होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तयार झालेल्या या नव्या आव्हानाला तोंड देण्यासाठी आता फॉरवर्ड मर्यादा केवळ एकवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला.
WhatsApp वर कोणतीही माहिती व्हायरल होण्यासाठी फार वेळ लागत नाही. यामुळे जशी खरी आणि उपयोगी माहिती नागरिकांपर्यंत पोहचते, तशीच खोटी आणि चुकीची माहिती देखील पोहचते. यामुळे अनेक दुष्परिणाम होतात. काहीवेळा अशा माहितीमुळे हिंसा आणि दंगली झाल्याचंही पाहायला मिळालं आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चुकीच्या आणि खोट्या माहितीने नवे प्रश्न तयार होऊ नये म्हणून WhatsApp कडून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत.
कोरोनाच्या नियंत्रणासाठी वैज्ञानिकांकडून पूर्ण प्रयत्न होत असतानाच WhatsApp वर अनेक चुकीची औषधे आणि आजार बऱ्या करण्याच्या अवैज्ञानिक गोष्टींचा प्रसार होत आहे. जगभरात अशा चुकीच्या औषध आणि पद्धतींमुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हे रोखण्यासाठी WhatsApp माहितीच्या तपासणी आणि सत्यतेवर देखील काम करत आहे. लवकरच ते फिचरही उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना आपल्यापर्यंत पोहचलेली माहिती खरी आहे की खोटी हे समजू शकणार आहे. सध्या तरी वापरकर्त्यांना मेसेज फॉरवर्ड करताना मर्यादा घालून देण्यात आल्या आहेत. यामुळे मेसेज फॉरवर्डमध्ये जवळपास 25 टक्क्यांची घट होईल, असा अंदाज WhatsApp कडून व्यक्त करण्यात आला आहे.
