Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जो खोटं बोलतो त्याचा देवेंद्र फडणवीस होतो



‘अच्छे दिन’चा नारा आणि ‘सर्जिकल स्ट्राईक’चा तोरा दाखवणार्‍या भाजपाला महाराष्ट्रातील जनतेने ‘फत्तेशिकस्त’करून हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, याची आठवण करून दिली. अच्छे दिनचा नुसता देणं म्हणजे काम फत्ते म्हणता येणार नाही आणि सर्जिकल स्ट्राईक ही आम्हीच केली, याचा तोराही दाखवता येणार नाही, हे त्रिवार सत्य सांगताना महाराष्ट्रातील जनतेने विधानसभेच्या निवडणुकीत ‘मी पुन्हा येईन...’चा नारा देणार्‍या मुख्यमंत्री फडणवीसांना शिकस्त देत १०५ वर आणून ठेवले. सातत्याने ‘मी’ पणा ‘अहम’पणा आणि अहंकारात असलेल्या फडणवीसांना मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने जणू खैबरखिंडीत अडवून ठेवलं अन् आज पंधरा दिवस उलटून गेले तरी देवेंद्र फडणवीसांना सरकार स्थापन करता आलं नाही, हे सर्व काही केवळ आणि केवळ भाजपासह देवेंद्र फडणवीसांच्या खोटारडेपणामुळेच झाल्याचे उघड झाले. महाराष्ट्राने खोटारडा राजा कधीच सहन केला नाही. तसा महाराष्ट्राने खोटारडा सत्ताधारीही पचन केला नाही. म्हणून आणि म्हणूनच या
खोटारडेपणामुळे
देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि महाराष्ट्राने पुन्हा एकदा दाखवून दिले, जो खोटं बोलतो त्याचा देवेंद्र फडणवीस होतो. आता प्रश्‍न असा असेल, शिवसेनेला खोटं बोललं म्हणजे फडणवीस अवघ्या महाराष्ट्राला खोटं बोललेत काय, परंतु गेल्या पाच वर्षांच्या कालखंडात देवेंद्र फडणवीसांनी राज्यात सत्ता हाकताना ज्या पद्धतीने तोडाफोडीचे आणि विश्‍वासघातकीचे राजकारण केले ते राजकारण महाराष्ट्राला शोभणारे नव्हते. नक्कीच मोदी-शहांच्या भाजपाला शोभणारे ते होते. परंतु फडणवीसांनी, आपण महाराष्ट्रात सत्ता हाकतोय हे लक्षात घ्यायला हवे होते, ते त्यांनी लक्षात घेतले नाही. उभा महाराष्ट्र गेल्या पाच वर्षांच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या प्रश्‍नावर रस्त्यावर उतरला, लोकशाही मार्गाने आपला न्याय-हक्क मागितला. परंतु जेंव्हा जेव्हा महाराष्ट्राची रयत रस्त्यावर उतरली तेव्हा तेव्हा त्यांना न्याय देण्यापेक्षा त्यांच्यात फूट कशी पाडता येईल? यात अधिक लक्ष मुख्यमंत्र्यांनी घातले. देशात केव्हाही शेतकरी राजा संपावर गेला नव्हता, ‘मढे झाकुनी करता पेरणी, कुणबियाचे वाही लवलाही’ हा सिद्धांत जोपासणारा शेतकरी संपावर गेला. रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागला. त्या शेतकर्‍याला न्याय देण्यापेक्षा, त्याचा हक्क देण्यापेक्षा मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यातील एका नेत्याला मध्यरात्री फोडून संप चिरडून टाकला. हा खोटारडेपणाचा कळस होता. मराठा आरक्षण असेल, मुस्लिमांचे आरक्षण असेल, धनगरांचे आरक्षण असेल यातही खोटेपणाचा कळस सातत्याने दिसून आला. मराठा आरक्षण न्याय दरबारी लढा दिल्यानंतर मिळाले. परंतु ते आरक्षण आम्हीच दिल्याच्या टिर्‍या बडवून घेण्यात मुख्यमंत्र्यांना अधिक रस वाटला. २०१४ च्या विधानसभा निकालानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ म्हणणारे फडणवीस धनगर समाजासमोरही खोटारडे ठरले. मेकिंग इंडिया, जलयुक्त शिवारसारख्या योजना पाण्यावरचे बुडबुडे राहिले. जलयुक्त शिवारावरून बरच काही झाल्याचा देखावा एकीकडे दाखवत असताना  जल तज्ञ एम.एच. देसरडा यांनी ही पद्धत चुकीची आहे, हे सांगितल्यानंतरही फडणवीसांनी आपला तोरा कायम ठेवला. हा अहमपणातला खोटारडेपणा कायम त्याठिकाणी दिसून आला. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि नंतर मराठवाडा पावसाने अक्षरश: झोडपून केला. इथला शेतकरी, सर्वसामान्य अक्षरश: उद्ध्वस्त केला. जेव्हा सांगली, सातारा, कोल्हापूर पाण्यात होते, मरणयातना सहन करत होते तेव्हा त्यांना भेटण्याचे सोडून महाराष्ट्राचे नेतृत्व करू पाहणारा हा नेता आपल्या राजकीय यात्रांमध्ये मश्गुल होता. सत्तेला सत्य मानणारा तेव्हाही फडणवीस हे मरणयातना सहन करणार्‍या लोकांसमोर खोटारडे ठरले. एवढेच नाही तर खोटेपणाचा कळस एवढा महाभयंकर होता जेव्हा आरक्षणाच्या मुद्यावर मराठे रस्त्यावर उतरले होते तेव्हा विठ्ठलाची महापुजा देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होऊ देणार नाही, अशी कठोर भूमिका मराठ्यांनी घेतली. सत्तेचा अहंकार आणि मस्ती देवेंद्रांच्या नसानसात भिनली होती. पुजा करायचीच तर मला कुणी अडवू शकत नाही, माझ्याकडे अमूक आहे तमूक आहे परंतु काही लोक वारीमध्ये साप सोडणार, असे खोटेपणाचे वक्तव्य याच देवेंद्र फडणवीसांनी करून आपली ‘तर्कशून्यता’ पाझळली होती. हे दोन-चार उदाहरण बोलके असले तरी सुरुवातीपासून शेवटपर्यंत देवेंद्र फडणवीस हे अत्यंत खोटारडेपणाने वागले आणि मी किती साव आहे यामध्ये ते सुखरूप राहिले. परंतु मांजर डोळे झाकून दूध पिते हे लोकांना दिसत असते हे देवेंद्र यांच्या का लक्षात आले नाही? याचे उत्तर द्यायचेच झाले तर सत्तेची गरमी आणि गुरमी फडणवीसांच्या मस्तकात भिनली होती. हे आता स्पष्ट करावं लागेल. खोटारडेपणाचा तो कळस पंढरपूरच्या वारीतील सापातून समोर आला आणि विठ्ठलाने आपले कडेवरचे हात कालच्या कार्तिकी एकादशीला खाली घेतले तसे मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीसही पायउतार झाले

वारीत साप सोडण्याची अफवा सोडणार्‍या मुख्यमंत्र्यांना बा विठ्ठलानेच बहुदा कार्तिक एकादशीच्या दिवशी राजीनामा देण्यास भाग पाडले, असं म्हटलं तर आमच्या सारख्यांकडे थोडसं संशयकल्लोळाने पाहितलं जाईल. परंतु विटेवर उभा असलेला काळा सावळा करकटेवरचा हा विठ्ठल खोटारडापणा सहन करत नाही, कारण तो कष्टकर्‍यांचा आहे, तो कामगार, दिनदुबळ्यांचा आणि सर्व जात-पात-धर्म-पंथाचा स्फूर्तीस्थान आहे. खोटारडेपणाला थारा न देणारा विठ्ठल आपला भक्त तुकोबांकडून सोळाव्या शतकात सांगून गेला,
खोट्याचा विकारा | येथे नव्हे काच हिरा
काय दावायाचे काम|  उगाच वाढवावा श्रम
परीक्षाविन, मिगरवो जाणो ते ते हीं |
तुका पाया पडे वाद पुरे हे झगडे |
तुकोबा आपल्या अभंगातून जेव्हा केव्हा संदेश देत आले आहेत तेव्हा तेव्हा तुम्ही चुक केली असेल तर ती मागे घ्या म्हणत आले आहेत.  परंतु
चुक कबूल करतील

ते फडणवीस कसे?
महाराष्ट्राला ज्या पद्धतीने खोटे बोलून पाच वर्षे फडणवीसांनी रेटलं तसं मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेलाही त्यांनी रेटत आणलं. परंतु २०१९ च्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने फडणवीसांच्या खोटारडेपणाला जबरदस्त चपराक दिली. ‘मी पुन्हा येईन...’च्या अहंकारात्मक आत्मविश्‍वासाला वेसन घातली, परंतु इथंही शिवसेनेला शब्द देऊन शब्द फिरवणार्‍या देवेंद्र फडणवीसांनी ‘मी’पणाचा तोरा सोडला नाही , तेव्हा मोडेन पण वाकणार नाही, असा दबदबा ठेवणार्‍या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या चिरंजीवाने आपला ताठरपणा या वेळेस ठेवला. जे ठरलं तेवढच द्या, त्यापेक्षा सुईच्या टोकापेक्षाही जास्त देऊ नका, परंतु मला खोटारडा ठरवू नका, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांसह मोदी-शहांना फटकारलं. मोदी - शहा जोडगोळीने अवघ्या देशात एकाधिकारशाहीला महत्व दिले असेल परंतु हा महाराष्ट्र जसा शिवबांचा आहे तसा संभाजीचा आहे, शाहू-फुले-आंबेडकरांचा आहे, नामदेव-ज्ञानेश्‍वर आणि तुकारामांचा हा महाराष्ट्र आहे. इथे स्वाभिमान विकला जात नाही, इथे खोटारडेपणा सहन केला जात नाही आणि जेव्हा केव्हा जो कोणी खोटं वागतो, खोटं बोलतो त्याचा देवेंद्र फडणवीस होतो.