जयपूरमध्ये कॉंग्रेसच्या बैठकीत ४० आमदारांनी सेनेला पाठिंबा देण्यास सहमती दर्शविली, राष्ट्रवादी सेनेसोबत जाण्यास सकारात्मक, सेनेचे खा. संजय राऊतकडून कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर स्तुतीसुमने
मुंबई (रिपोर्टर):- महाराष्ट्रात कालपासून काळजीवाहू सरकार आल्यानंतर आता सत्ता स्थापनेबाबत वेगवेगळे विकल्प समोर येत असतानाच ‘महाशिव आघाडी’ तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून शिवसेनेचे संजय राऊत यांनी कॉंग्रेस हा आमचा दुश्मन नाही, असे म्हणत कॉंग्रेसची स्तूती केली आहे तर दुसरीकडे जयपूर येथील कॉंग्रेसच्या बैठकीत तब्बल ४० आमदारांनी भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेनेला मदत करण्याची तयारी दाखवल्याने आता महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस अशी सत्ता स्थापन होण्याचे चिन्ह दिसून येत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या एका वक्तव्याने दुरावलेली शिवसेना मुख्यमंत्रीपदावर ठाम असून आता युतीत काडीमोड झाल्याचे निश्चित मानले जात असतानाच आज राज्यपालांनी भाजपाला सत्ता स्थापनेबाबत पत्र दिले. मात्र दुपारी एक वाजेपर्यंत भाजपाने दावा केला नाही. दुसरीकडे शिवसेनेचे खा. संजय राऊत हे कॉंग्रेससह राष्ट्रवादीवर स्तुती सुमने उधळताना दिसून आले. राष्ट्रवादी ही सकारात्मक दृष्टीकोन ठेवून बोलत आहे तर जयपूरमध्ये कॉंग्रेसच्या ४० आमदारांनी शिवसेनेसोबत जाण्यास काहीच हरकत नाही, अशी भूमिका घेतली. सर्व अधिकार कॉंग्रेस पक्ष अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे महाराष्ट्रात आता कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून सत्ता स्थापन करेल, असे संकेत मिळत आहेत. महाराष्ट्रात आता महाशिव आघाडी तयार होऊन मुख्यमंत्री शिवसेना होईल, असे चिन्ह दिसत आहेत.
शिवसेनेकडून अद्याप प्रस्ताव
नाही -शरद पवार
महाशिव आघाडीची राज्यभर चर्चा होत असतानाच पत्रकारांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवारांना याबाबत विचारले असता शिवसेनेने अद्याप आपल्याकडे सत्ता स्थापनेबाबत अथवा अन्य समर्थनाबाबत कुठलाही प्रस्ताव मांडलेला नाही. त्यामुळे याबाबत मी काही बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतरच सेनेला पाठींबा द्यायचा की नाही याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
असं असेल सत्तावाटप?
राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेच्या महाआघाडीचं सरकार आल्यास सत्तेचं वाटप कसं करायचं, यावरील चर्चाही आता सुरू झाली आहे. कॉंग्रेसमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २५ मंत्रिपदे शिवसेनेला, उर्वरीत राष्ट्रवादीला व विधानसभा अध्यक्षपद कॉंग्रेसला असं वाटप होण्याची शक्यता आहे.
अधिक माहिती:
