दिवस रात्र काबाडकष्ट करून जीव तोड मेहनत करून शेतकरी आपला शेती व्यवसाय करतात. मेहनत जास्त आणि उत्पन्न कमी अशी शेतकर्यांची कठीण अवस्था निर्माण झाली आहे. जिवापाड जपलेल्या पीकांची कित्येक महिने निगा राखली जाते. मात्र ही पीके जोपर्यंत बळीराजाच्या घरात येवून पडत नाही तोपर्यंत त्यांना आपली म्हणताच येत नाही. आसमानी सुलतानी संकटे त्यांच्या पीकावर कधी आक्रमण करतील हे सांगता येत नाही. याचा मोठा फटका गरीब शेतकर्यांना बसतो. यंदा खरीपाचे पीके मोठ्या जोमात येतील आणि आपल्या कुटुंबाला मोठा दिलासा देवून या उद्देशाने शेतकरी राजा कर्ज काढून खरीप पिकाची पेरणी केली होती. मोठ्या जोमाने तोंडात आलेल्या घासासारखे खरीप पीके दिसत होती. त्यामुळे शेतकरी राजा खुप आनंदी होता. मात्र अचानक काही भागात महापूर आला. व सर्व पीके पाण्यात नष्ट होवून गेली. अचानक परतीच्या पावसााचा वेग वाढला आणि त्याने त्याचा जोर लावून धरला. त्यामुळे शेतात असणारी पीके सडली व नष्ट झाली. काढून ठेवलेल्या पीकांनाही कोंबे फुटली व सर्वत्र पीक बरबादी झाली. शेतकर्यांच्या नशिबी फक्त चिंताच आली. खरीपाचे सर्व पीक वाया गेल्याने नंतर रब्बीच्या पीकांची वेळ आली. विविध कारणामुळे ही पीक पेरणी संतगतीने सुरू आहे. त्यामध्ये मोठी घट झाल्याची दिसून आली. बीड जिल्ह्यात सर्व साधारण रब्बी पीकांचे क्षेत्र ४ लाख २२ हजार ७३० हेक्टरवर आहे. तरीही यंदा रब्बीच्या पेरण्या ९७ हजार ३० हेक्टरवरच म्हणजे जिल्ह्यात फक्त २३ टक्के क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत. एवढी मोठी घट रब्बी पेरण्यात दिसून आली. अगोदर खरीपाची पीके नष्ट झाली. त्यानंतर आता तुरळक असणार्या रब्बी पीकावरच शेतकरी आशा धरून आहे.
मराठवाड्यातील पेरण्या
मराठवाड्यातील रब्बी पीकांचे क्षेत्र १९ लाख हेक्टर असून फक्त १ लाख ४५ हजार ३३१ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. त्यामध्ये औरंगाबाद १६ हजार ९५५ हेक्टरवर ८.१४ टक्के पेरण्या झाल्या. जालना ३० हजार ७७७ हेक्टर १७.४२ टक्के, बीड ९७ हजार ३० हेक्टर २३ टक्के, लातूर ३९ हजार ६६१ हेक्टर, उस्मानाबाद ४७ हजार ३३७, परभणी ९ हजार ९७१ हेक्टर अशा रब्बीच्या पेरण्या झालेल्या आहेत. म्हणजे अत्यंत कमी प्रमाणास यंदा रब्बी हंगामात पेरण्या पार पडलेल्या आहेत. याचा शेतकर्याच्या उत्पन्नासह अर्थ व्यवस्थेवर मोठा फटका बसणार आहे.
रब्बी पेरण्यात संथगती व घट
यंदा खरीप पीकांचे मोठे नुकसान झाल्याने रब्बी पेरण्या कमी प्रमाणात करण्यात आल्या. तसेच त्यांची कामे संतगतीने सुरू आहेत. सततच्या सुरू असणार्या पावसामुळे लवकर जमिनी वाफशावर आल्या नाहीत. त्यामुळे जमिनी पेरणी योग्य करण्यासाठी त्यांना अधिक विलंब करावा लागला. काही ठिकाणी दुबारपेरण्याचेही संकट कोसळले. त्यामुळे दुबार पेरण्या कराव्या लागल्या. त्यासाठी बियाणे, पेरणी, खते, पैसा असा खर्च शेतकर्यांना पुन्हा करावा लागल्याने अशा विविध कारणामुळे रब्बी पेणर्यात घट व संतगती दिसून आली.
