माजलगाव :- परतीच्या पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला असून यामुळे खरीप आणि रब्बीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकर्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या, या प्रमुख मागणीसाठी बीड येथील जालना रोडवरील ओरिएन्ट इन्शूरन्स कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. तर दुसरीकडे माजलगाव तालुक्यातील नित्रूड येथे कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर एक तास आंदोलन केले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. हे आंदोलन कॉ. दत्ता डाके यांच्या नेतृत्वाखाली झाली.
गेल्या १७ दिवसांपासून बीड जिल्ह्यासह मराठवाड्याला परतीच्या पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे बाजरी, ज्वारी, कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, मूग इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकर्यांच्या हातातोंडाला आलेला घास अतिरिक्त पावसाने हिरावून घेतला. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने विमा कंपनीने शंभर टक्के विमा शेतकर्यांना द्यावा. तसेच बांधावर जावून पिकांची पाहणी करावी, यासह इतर मागण्यांसाठी आज दुपारी गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून जालना रोडवरील ओरिएन्ट इन्शूरन्स कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला तर दुसरीकडे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने त्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी माजलगाव तालुक्यातील नित्रूड येथील कॉ. दत्ता डाके यांच्या नेतृत्वाखाली महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी संदीप तेलगड, जनक तेलगड, रामा राऊत, सय्यद युनुस, श्यामराव राठोड, विजयकुमार डाके, पांडुरंग उबाळे, दत्ता घुले, पोपट गायकवाड, शेख खलील, पवार गणपत, राघवेंद्र कुलकर्णी, रामभाऊ पवार, अशोक डाके, अशोक तातोडे, नारायण तातोडे, सय्यद जिलानी, गिराम रामेश्वर, विकास डाके सह आदी शेतकर्यांची उपस्थिती होती. या रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.
