Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मी पुन्हा येईल.. मी पुन्हा येईल.. मी पुन्हा येईल..! बसा आमच्या बोकांडीवर - गणेश सावंत






दुष्काळाच्या निखार्‍यावर होरपळलेल्या शेतकर्‍यांनी आपले कसेबसे जीवन सुरू ठेवले. थोड्या फार पावसावर अर्धवट वाढ झालेल्या पिकांकडे भविष्य म्हणून पाहिले. परंतू तिथंही शेतकर्‍यांच्या या भविष्याला नजर लागली. परतीच्या पावसाने शेतकर्‍यांना अक्षरश: झोडपून काढले. शेतातील उभे पीक उद्धवस्त झाले, हाताशी आलेल्या बाजरीच्या कणसांना कोंब फुटले. काढून ठेवलेलं सोयाबीन भिजून चिंब झालं, त्याल बुरा आला. दोन-चार फुटलेल्या बोंडातील कापसाच्या वाती झाल्या. सरकींनाही कोंब फुटले. शेतकर्‍यांवर आभाळ कोसळले. तो अकसा-बोकसं रडू लागला, घरातलं सर्व काही संपलेलं, अठरा विश्‍व दारिद्रय परसासह घरात दिसून येवू लागलं. भविष्य अंधकारमय असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं. ही स्थिती बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांचीच नव्हे तर अखंड महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची होवून बसली. कुठे कोरड्या दुष्काळाने शेतकर्‍यांना होरपळून काढणं सुरू ठेवलं तर कुठे ओल्या दुष्काळाने शेतकर्‍याचं आयुष्य उद्धवस्त केलं. एकीकडे हे महाराष्ट्राचे चित्र असतांनाच दुसरीकडे मात्र सत्ता स्थापनेचा आखाडा होवून बसला. विधानसभेच्या निवडणूका होवून आज दहा दिवस लोटून गेले तरी अद्याप महाराष्ट्राच्या वर्षाला अधिकृत नवरा मिळाला नाही. आजही वर्षा बंगल्यावर फडणवीसांचंच राज्य आहे. घेवू शिव छत्रपतींचा आशिर्वाद देवून मोदींना साथ म्हणणार्‍या भाजपाने शिवछत्रपतींचे विचार मात्र अंगीकारले नसल्याचे दिसून येते. केवळ सत्ता आपल्याच बुडाखाली असावी हा जो कर्मट ध्येयवाद फडणवीसांच्या उराशी आहे तोच ध्येयवाद त्यांना नडतोय म्हणूनच युतीला बहुमत असतांनाही राज्यात सत्ता स्थापन होत नाही. राज्यातील जनतेने शिवसेना-भाजपाला स्पष्ट बहुमत दिले असतांना केवळ राज्यात फडणवीसशाहीचाच बोलबाला व्हावा हा जो फडणवीसांचा तोरा आहे त्या तोर्‍याला आता संतापून मी पुन्हा येईल म्हणताच महाराष्ट्रातील जनतेकडून बसा आमच्या बोकांडीवर असं उत्तर मिळतयं. हा संताप भाजपाबरोबर शिवसेनेनेही ओळखायला हवा, निवडणूका होवून दहा दिवस लोटून गेले असतांना जर भाजपा आणि शिवसेना राज्यात सरकार स्थापन करू शकत नसेल तर एवढे तुम्ही षंढ कसे, पायाखाली आग तरी थंड कसे? हा सवाल विचारावाच लागेल. युतीचा धर्म कसा पाळला जातो हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, प्रमोदजी महाजन, गोपीनाथजी मुंडे या ईहलोकी गेलेल्या नेतृत्वाकडून शिकायलाच हवे. आज महाराष्ट्रातली जी हाहाकार उडून देणारी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला या तीनही मातब्बरांनी यथायोग्य तोंड दिले असते. म्हणूनच आज
स्व.मुंडेंची आठवण येते
१९९० च्या दशकामध्ये शेटजी, भटजीचा पक्ष म्हणून ज्या भाजपाकडे पाहिलं जात होतं त्या भाजपाला ओबीसी झालर लावत बहुजनांचा पक्ष म्हणून स्व.गोपीनाथराव मुंडेंनी महाराष्ट्रात आणलं. वाडी, वस्ती, तांड्यासह गावागावात मुंडेंनी भाजपाचे बीज रोवले आणि १९९५ साली या बीजाचे महाराष्ट्रात सेना-भाजपाच्या सरकारच्या निमित्ताने वृक्ष दिसून आले. आम्हाला आजही आठवतं १९९५ साली गोपीनाथ मुंडे जेंव्हा उपमुख्यमंत्री झाले तेंव्हा राजू शुक्ला यांनी त्यांची मुलाखत घेतली होती. हिंदी चॅनलने घेतलेली ही मुलाखत आज भाजप नेत्यांनी आणि फडणवीसशाही चालवण्याचा अठ्ठहास दाखवणार्‍यांनी पाहिली तरी भाजप काय आहे आणि युतीचा धर्म कसा पाळला जातो हे यावरून दिसून येईल. राजु शुक्ला गोपीनाथरावांना म्हणाले, महाराष्ट्र म्हणजे गोपीनाथ मुंडे, गोपीनाथ मुंडे म्हणजे भाजप तेंव्हा गोपीनाथराव मुंडे म्हणाले, असं नाही, मी तर आता दहा वर्षे झालं सक्रीय राजकारणात आलोय. गेल्या कित्येक वर्षापासून उत्तमराव पाटलांनी हा पक्ष चालवलाय. फरांदे असतील, वाहडणे असतील, डांगे असतील यांची उभी हयात पक्षासाठी गेली आहे. त्यावर राजुु शुक्ला पुन्हा म्हणाले, महाराष्ट्रात मायनस मुंडे म्हणजे? त्यावरही गोपीनाथरावांनी मी म्हणजे भाजप असं नाही. आम्ही सर्वांनी जेंव्हा कष्ट केले तेंव्हा भाजप उभा राहिले. मुंडेंचा खिसा एवढाही मोठा नाही की त्यामध्ये भाजप सामावले जाईल. एवढे मात्र खरे भाजप कुठल्या एका व्यक्तीला मोठं करणारा नाही आणि एखाद्या व्यक्तीला मोठं करण्यासाठी त्याच्या पाठिशीही उभा राहणारा नाही. आम्ही एका व्यक्तीला मोठं करण्यासाठी त्याच्या पाठिशी उभा राहू इच्छित नाही आणि स्वत:च्या पाठीमागे ही कोणाला उभे करू इच्छित नाही. हा सर्वांचा पक्ष आहे. शिवसेना आणि भाजपाचे विचार जुळतात, दोघांचे मुद्दे एक आहेत, त्यामुळे ही युती कायम अबाधित राहिल. मला मुख्यमंत्री पदाची लालसा नाही असं छाती ठोकपणे सांगणारा फरडा आणि सच्चा नेता आज भाजपात नाही म्हणून आणि म्हणूनच शिवसेना-भाजपामध्ये सत्तेसाठी ओढाताण होत आहे. गोपीनाथराव जर आज असते, बीड जिल्ह्यासह राज्यातील शेतकर्‍यांची अवस्था त्यांनी पाहिली असती तर अगोदर गोपीनाथरावांनी सत्तेपेक्षाही शेतकर्‍यांची काळजी केली असती. मुख्यमंत्री कोण होईल कोण नाही या पेक्षा अगोदर राज्याला मुख्यमंत्री द्या, सरकार द्या लोकांचे प्रश्‍न सोडवण्याला प्राधान्य द्या ही भूमिका गोपीनाथरावांनी घेतली असती. परंतू आज भाजपामध्ये जे काही लोक नेतृत्व करत आहेत, मग ते मुख्यमंत्र्यापासून जिल्ह्याचे नेतृत्व करणारे का असेनात ते केवळ अहम्‌पणामध्ये, अहंकारामध्ये बरबटलेले आहेत. आम्हीच सर्व काही म्हणणारे, मी पणात वागणारे आणि मी पुन्हा येणार म्हणून अहम्‌पणाचे दर्शन घडवणारे त्या भाजपात उरले. मग गोपीनाथरावांच्या वारसदार सुद्धा या लाईनमध्ये येवून बसल्या म्हणूनच अहम्‌पणाला हा महाराष्ट्र थारा देत नाही हे २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्रातल्या रांगड्या मतदारांनी दाखवून दिले. आज सरकार स्थापनेचा
भाजपाकडून जो पोरखेळ
सुरू आहे  तो मदमस्तीचा आणि हुकूमशाही वृत्तीचा म्हणावा लागेल. शिवसेना, भाजपामध्ये काय बोलणे झाले याचं आम्हाला देणं-घेणं नाही. परंतू मुंडे महाजनापासून आणि वाजपेयी-बाळासाहेब ठाकरेंपर्यंत शिवसेना भाजप युती ही अभेद होती. परंतू जसेच गोपीनाथ मुुंडेंचे चेले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि देशाचं नेतृत्व मोदी-शाह करू लागले तेंव्हापासून भाजपातला राम गेला, नथुरामने डोकं वर काढलं, लोकशाही संपुष्टात येवू लागली, एकाधिकार शाहीला अधिक महत्त्व प्राप्त होवू लागलं, अजातशस्त्रु असणारे अटलजी आणि त्यांचे विचार हरपून गेले. हिटलरचा असूड मोदी-शाहांच्या हाती आला. हम करे सो कायदा हे धोरण पदोपदी राबवण्यात येवू लागलं. सत्ता येत नसेल तर साम,दाम,दंडाचा वापर करण्यात येवू लागला. न्यायालयांपासून ईडी, सीबीआयपर्यंत मोदी-शाहांच्या कटपुतल्या झाल्या. हे गेल्या पाच वर्षामध्ये उभ्या महाराष्ट्राने नव्हे तर हिन्दुस्तानने याची देही याच्या डोळी पाहिले अन् आज महाराष्ट्राच्या नशिबी लग्न होवूनही रंडकंपण केवळ सेना भाजपात एक सुत्रता नसल्याने आलं आणि त्याचा फटका राज्यभरातल्या शेतकर्‍यांना बसतांना दिसून येवू  लागलं. शेतकरी आर्थिक अडचणीत आहे, उभ्या पीकामध्ये पाणी घुसलं आहे, पीके नासली आहेत, त्याला बुरशी चढली आहे, पंचनाम्याचे नाटके चालू आहेत परंतू त्याला तात्काळ मदत देण्यासाठी सरकार मात्र राज्यात नाही. अमुक तारीख दाखवली जाते, राष्ट्रपती राजवटीची भिती भाजपाच्या नेत्यांकडून राज्याला दाखवण्यात येते, त्यामुळे राज्यातला सर्वसामान्य प्रचंड संतापला आहे. ज्यांना सत्तेसाठी मते दिली, राजकारभार करावा, आमच्या शेतातील भाजीच्या देठालाही कोणी हात लावू नये यासाठी सरकार मायबाप निवडूण दिल. परंतू हे सरकार कोणा एका व्यक्तीच्या हातात सत्ता कशी राहिल, त्या व्यक्तीची एकाधिकारशाही कशी चालेल यासाठीच काम करत असेल तर संतापून महाराष्ट्रातली जनता मी पुन्हा येईलच्या नार्‍यावर बसा आमच्या बोकांडीवर असंच उत्तर देईल. त्यामुळे आता तरी सुधरा, महाराष्ट्राला स्थिर सरकार द्या आणि सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसासह कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दीनदुबळ्यांसह बेरोजगारांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी काम करा.