मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ताठरपणा अखेर शिवसेनेच्या अक्रमकतेपुढे नमला गेल्याचे सुत्राकडून सांगण्यात येस असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बॅकफुटवर आले आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा शिवसेना भाजपा युतीचे सरकार स्थापन होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी तशा हालचाली सुरू केल्याचे सुत्रांचे सांगणे आहे. मात्र शिवसेनेचे संजय राऊत आजही शिवसेना बहुमत सिद्ध करू शकते आणि शिवतिर्थावर शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेवू शकतो असे पुन्हा एकदा वक्तव्य केले आहे.
विधानसभा निवडणूकीचा निकाल लागून दहा दिवस उलटून गेले तरी राज्यात सरकार स्थापन करण्यात भाजपाला यश आले नाही. उलट शिवसेना भाजपातील तणाव वाढवण्यात मुख्यमंत्र्यांना प्रचंड यश आले. एकीकडे लोकसभा निवडणूकी दरम्यान सेना-भाजपाचं ठरलं असे सांगितले जात असतांनाच मुख्यमंत्र्यांनी आमचं तेंव्हा काहीच ठरलं नव्हतं असे म्हणून शिवसेनेला अंगावर घेतलं. सुधीर मुनगंटीवारांनी राष्ट्रपती राजवटीची भाषा केली त्यामुळे युतीतला तणाव प्रचंड वाढला. पुलोद सरकारची भाषा होवू लागली. अशातच भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ताठरपणा कमी करण्याच्या सूचना दिल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस हे बॅक फुटवर आले असल्यामुळे राज्यात पुन्हा शिवसेना भाजप युतीचं सरकार स्थापन होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. परंतु अद्यापही दोन्ही पक्षातील नेत्यात संवाद दिसून येत नसला तरी सेनेची मनधरणी करण्यासाठी भाजप स्वत:हून आज पुढं येण्याची शक्यता आहे. असे असले तरी आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिवसेना सरकार स्थापनेचा दावा करत बहुमत सिद्ध करू शकते अणि शिवतिर्थावर शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेवू शकतो असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे सरकार स्थापनेचा खुर्ची खेळ अद्यापही सुरू आहे. परंतू भाजपाने माघार घेतली तर सेना भाजपाचं सरकार पुन्हा एकदा राज्यात स्थापन होवू शकतं.
