![]() |
| प्रभाकर साहेबराव मुंडे |
बीड :- गेल्या पाच वर्षांपासून मराठवाड्यासह बीड जिल्हा दुष्काळाचे चटके सोसत आहे. यावर्षी सुरुवातीला थोडा पाऊस पडल्यानंतर शेतकर्याने पदरमोड करून महागमोलाचे बी-बियाणे खरेदी करून काळ्या आईची ओटी भरली. रात्रंदिवस काबाड कष्ट करून पिके जगवली. हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी नैराश्यात आले आहेत. वडवणी तालुक्यातील एका शेतकर्याचे सात एकर पीक पाण्यात गेले, आता उपवर झालेल्या मुलींचे लग्न कसे करायचे? या नैराश्येतून ३७ वर्षीय तरुण शेतकर्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची विदारक घटना आज सकाळी समोर आली.
रामा बापूराव शिंदे (वय ३७, रा. देवळा ता. वडवणी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गेल्या पाच वर्षाच्या दुष्काळाच सामना करत कसाबसा संसाराचा गाडा ओढला. यावर्षी मुलीचे लग्न करायचे म्हणून सात एकर जमीनीत कांदा व कापूस लावला. आता या पिकावर मुलीचे हात पिवळे करण्याचे स्वप्न रामा शिंदे यांनी पाहिले. मात्र दिवाळीमध्ये झालेल्या अतिवृष्टीने रामा शिंदेसह अनेक शेतकर्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले. या चिंतेतून त्यांनी रात्री विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गंभीर अवस्थेत नातेवाईकांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुलगी असा परिवार आहे.
भोगलवाडीत कर्जबाजारी शेतकर्याने घेतला गळफास
बीड :- धारूर तालुक्यातील भोगलवाडीमध्ये प्रभाकर मुंडे या शेतकर्याने आज पहाटे चार वाजता बँकेचे कर्ज व सततच्या नापिकीला कंटाळून शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपविले.
भोगलवाडी येथील प्रभाकर साहेबराव मुंडे (वय ४५) या शेतकर्याने आपल्या मुलीच्या लग्नासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक, बीड व एसबीआय धारूर बँकेचे कर्ज घेतलेले होते. ते कर्ज न फिटल्याने तसेच सततच्या सुरू असलेल्या पावसाने दोन एकर सोयाबीन तसेच कापूस वाया गेल्याने आता कर्ज कसे फेडायचे? या चिंतेतून त्याने आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी येणार्या-जाणार्या लोकांच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर धारूर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. घटनास्थळी येऊन पोलिसांनी पंचनामा केला.
