Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

लातूरमध्ये काँग्रेसचा महापौर; भाजपला धक्का

लातूर: राज्यात बदलत असलेल्या सत्ता समीकरणाचे आता जिल्ह्याजिल्ह्यात परिणाम जाणवू लागले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून लातूर महापालिकेतील भाजपचं वर्चस्व काँग्रेसने संपुष्टात आणलं आहे. भाजपचे काही नगरसेवक गळाला लावून काँग्रेसने लातूर पालिकेत काँग्रेसचा महापौर बसवला असून भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आज झालेल्या लातूरच्या महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे यांना ३५ मते मिळाली. तर भाजपाचे शैलेश गोजमगुंडे यांना ३३ मते मिळाली. त्यामुळे विक्रांत गोजमगुंडे हे लातूरचे नवे महापौर म्हणून निवडून आले आहेत. भाजपचे नगरसेवक चंद्रकांत बिराजदार आणि गीता गौड या दोन नगरसेवकांनी काँग्रेसला मतदान केले. तसेच राष्ट्रवादीची साथ सोडून वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणूक लढवलेले राजा मणियार यांनीही काँग्रेसला साथ दिल्याने भाजपला पराभव स्विकारावा लागला आहे. धक्कादायक बाब म्हणजे उपमहापौरपदाच्या निवडणुकीतही भाजपला धक्का बसला आहे. उपमहापौरपदासाठी उभे असलेले भाजपचे बंडखोर नगरसेवक चंद्रकांत बिराजदार हे निवडून आले आहेत. त्यांनी ३५ मते घेत भाजपच्या अधिकृत उमेदवार भाग्यश्री कौळखेर यांचा पराभव केला. कौळखेर यांना ३२ मते मिळाली. भाजपच्या नगरसेविका शकुंतला गाडेकर या अनुपस्थित राहिल्याने उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचं एक मत कमी झालं. लातूर महापालिकेत काँग्रेसचाच महापौर बसवण्यासाठी काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी खास रणनीती आखली होती. त्यांनी भाजपच्या दोन्ही नगरसेवकांना गळाला लावतानाच दोन्ही काँग्रेसचे नगरसेवक फुटणार नाहीत याची काळजी घेतली होती. त्यामुळेच संख्याबळ कमी असतानाही लातूर महापालिकेतील भाजपकडे असलेलं महापौरपद खेचून आणण्यात देशमुख यांना यश आलं आहे. देशमुख यांच्या या रणनीतीमुळे माजी मंत्री संभाजी निलंगेकर यांना मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे.