Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पक्षांतराच्या पहिल्याच निवडणुकीत पराभव




मजीद शेख | बीड
राष्ट्रवादीतील अंतर्गत बंडाळी यामुळे बदामराव पंडीत आणि जयदत्त क्षीरसागर यांनी पक्षाला सोडून शिवबंधन हाती बांधलं होतं, या दोन्ही नेत्यांचा शिवसेनेतील प्रवेश म्हणजे २०१९ च्या विधानसभा निवडणुका समोर ठेवूनच होता. काहीही झालं तरी आपण निवडून येतोत असा दोघांना आत्मविश्‍वास होता, पण या दोघांच्या आत्मविश्‍वासाला खो बसला. जिल्हयात शिवसेनेला फक्त एकच जागा सुटली होती, ती बीडची, त्यात ही शिवसेनेला यश राखता आलं नाही. गेवराईत बदामराव यांनी सरळ-सरळ बंडखोरी करुन उमेदवारी दाखल केली होती,मात्र बदामराव हे शिवसेनेचेच होते. त्याच्यावर पक्षांनी कुठलीही कारवाई केलेली नव्हती. गेवराई आणि बीडमध्ये शिवसेनेला पराभव पहावा लागल्याने आता पुन्हा शिवसेनेला मोठया जोमाने कामाला लागावे लागणार आहे. आगामी काळात या दोघांच्या भुमिका काय असतील याकडे लक्ष लागून आहे.
जयदत्त क्षीरसागर हे जिल्हयातील बडे नेते, स्व. मुंडे यांच्यानंतर क्षीरसागर यांचे जिल्हयात नव्हे तर मराठवाड्यातील राजकारणात नाव घेतले जाते. जयदत्त क्षीरसागर हे १९९९ पासून राष्ट्रवादीत होते, सत्तेच्या काळात क्षीरसागर दहा वर्ष मंत्री राहिले, मात्र अंतर्गत राजकीय कुरघोड्या आणि घरातील भांडणातून क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीशी फारकत घेतली व त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान, शिवसेनेत प्रवेश केला. क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने अनेकांनी आश्‍चर्य व्यक्त केले होते, आज पर्यंत क्षीरसागर हे धर्मनिरपेक्ष पक्षासोबत होते, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत त्यांची संपुर्ण ह्यात गेली, आणि आता शिवसेना प्रवेश म्हणजे क्षीरसागर यांचे राजकारण नेमकं कुणीकडे चाललं असाही काहींनी विचार करणे सुरु केले होते, जयदत्त क्षीरसागर यांचा शिवसेनेत प्रवेश जुन्या आणि नव्या शिवसैनिकांना अस्वस्थ करुन सोडणारा होता, त्यातच क्षीरसागरांनी सगळ्यांशी जुळवून घेण्याचं ठरवलं व सगळ्यांना एकाच स्टेजवर आणण्याचा प्रयत्न निवडणुकीत झाला, आपण बीडमधून निवडून येणारच असंच गणीत क्षीरसागर मांडत होते, निवडणुकीच्या तयारीत ते गेल्या एक वर्षापासून होते, आपल्याला निवडणुक कशी सोपी जाईल या उद्देशाने त्यांनी तशी व्युहरचना आखली होती, पण क्षीरसागर यांचा अल्पमतांनी पराभव झाला. क्षीरसागरांचा पराभव त्यांचेच पुतणे संदीप क्षीरसागर यांनी केला. घरातच क्षीरसागर हारल्याने कार्यकर्त्यांचे मनोबल खचले आहे. क्षीरसागरांना हा पराभव आत्मचिंतन करायला लावणारा आहे. दुसरे शिवसेनेचे नेते बदामराव पंडीत हे गेवराई मधून अपक्ष म्हणुन उभे होते, आपल्याला उमेदवारी मिळेल या आशेने बदामराव शिवसेनेत गेले होते, मात्र भाजपा-शिवसेनेची युती झाल्याने गेवराईची जागा भाजपाला सुटली, त्यामुळे बदामराव यांना शिवसेनेकडून तिकीट मिळू शकले नाही. बदामराव यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणुक लढवली, पण त्यात ते हारले, आपण अपक्ष निवडून येवू असं बदामराव यांना वाटलं होतं, कारण बदामराव यांना अपक्ष म्हणुनच पहिला गुलाल लागलेला आहे. बदामराव यांच्याकडे कार्यकर्त्यांची फळी आहे. जि.प.चे चार सदस्य त्यांचे निवडून आलेले आहे. त्यामुळे बदामराव यांनी उमेदवारी मागे न घेता लढणं पसंद केलं, मात्र त्यांचा पराभव झाला. जयदत्त क्षीरसागर आणि बदामराव पंडीत या दोघांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. पक्षांतर केल्यानंतर दोघे पहिल्या निवडणुकीला समोरे गेले आणि पक्षांतरानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत त्यांना अपयशाला समोेरे जावे लागले. आता या दोघांची पुढची भुमिका काय राहिल याकडे लक्ष लागून आहे.