Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

विमा कंपनीकडून शेतकर्‍यांची दिशाभूल होत आहे





गेवराई (:- तालुक्यातील बहुतांश भागात सर्व शेतकर्‍यांची पीके चांगली आली होती. परंतु रोज सुरू असलेल्या परतीच्या पावसाने सर्व पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्व पिकांचा शेतकर्‍यांनी विमा उतरवला आहे. मात्र विमा कंपनी नुकसान झालेल्या पिकाचे पुरावे मागत असून हे पुरावे सादर करण्यास शेतकर्‍यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तर कागदपत्रे जमा करण्यास तलाठ्यांकडे चकरा मारून रांगेत उभा रहावे लागत असल्याने शेतकरी बेजार झाल्याचे दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने सर्वच पिकाचे नुकसान झाले असून शेतकर्‍यांना पीक नुकसानीचे एकत्र पंचनामे करून आर्थिक मदत ंदेण्याऐवजी विमा कंपनी शेतकर्‍यांची पिळवणूक करत असल्याचे दिसून येत आहे. विमा कंपनी नुकसान झालेल्या पिकाचे पुरावे मागत असून नुकसान झालेल्या पिकासाठी नुकसान अर्ज करण्यात यावा तसेच या अर्जासोबत सात बारा,आठ अ, पीक विमा भरलेली पावती,आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स असे कागदपत्रे कृषी कार्यालय गेवराई येथील विमा प्रतिनिधीकडे जमा करण्याच्या सूचना देत आहे. यासाठी फक्त ७२ तासाचा कालावधी असल्यामुळे शेतकर्‍यांनी या कार्यालयात गर्दी केली आहे. याठिकाणी शेतकर्‍यांशी संपर्क केला असता एक अर्ज दाखल करण्यासाठी तीनशे ते पाचशे रुपये खर्च येत असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. मात्र तालुक्यात झालेल्या परतीच्या पावसाने  स्थानिक आपत्तीसाठी बाधित क्षेत्र २५%पेक्षा जास्त असेल तर अधिसूचीत क्षेत्रातील सर्व पात्र शेतकरी नुकसान भरपाईस पात्र आसतील असा नियम असताना देखील बाधित क्षेत्राची पाहणी न करताच शेतकर्‍यांना अर्ज करण्याच्या सूचना देवून विमा कंपनी शेतकर्‍यांना नाहकत्रास देत असल्याचे दिसत आहे.  या २५ टक्के बाधित क्षेत्रापेक्षा निश्चितच जास्त नुकसान झाले असतांना देखील कंपनी शेतकर्‍यांना ७२ तासाचा कालावधी देत अर्ज दाखल करण्यास सांगत असून ७२ तासात अर्ज दाखल केलेल्या शेतकर्‍यांना ठरवून दिलेल्या नियमानुसार विमा रक्कम प्राप्त होईल का? असा प्रश्न उपस्थितीत होत आहे. तर असे अर्ज दाखल करून घेण्या अगोदर महसूल विभागाकडून पंचनामे करणे गरजेचे आहे व या पंचनाम्याच्या अहवालानुसार पीक विमा शेतकर्‍यांना देणे गरजेचे असतांना शेतकर्‍यांना अर्जाची अट घातल्याने अर्ज दाखल करण्यासाठी शेतकरी तलाठी व कृषी कार्यालयात गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे.
चौकट
प्रत्येक मंडळात दोन ठिकाणी नमुना 
सर्व्हेक्षण करून मदत द्या-सचिन मोटे
तालुक्यात दोन लाखाच्या पुढे शेतकर्‍यांनी विमा भरणा केला आहे.पिकाचे जास्तीचे नुकसान होवून देखील विमा कंपनीकडून ठरवून दिलेल्या कालावधीत पाहणी करणे शक्य नसताना देखील शेतकर्‍यांना कमी कालावधीत अर्ज दाखल करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. यामुळे शेतकर्‍यांना नाहकत्रास होत आहे. तर याबाबत प्रशासनाने प्रत्येक मंडळात दोन ठिकाणी नमुना पाहणी करून आर्थिक मदत व विमा कंपनीने या आधारच विमा मंजूर करावा अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन मोटे यांनी केली आहे.