मुंबई: आज सायंकाळी ट्विटवर ट्विट करून खळबळ उडवून देणारे राष्ट्रवादीचे बंडखोर नेते, उपमुख्यमंत्री आज रात्री उशिरा घरातून बाहेर पडले आणि त्यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव पार्थ पवार हे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांमध्ये तब्बल अर्धातास खलबतं झाली. यावेळी या बैठकीला भाजपचे इतरही नेते उपस्थित असल्याचं सांगण्यात येतं. या बैठकीत उद्या कोर्टात होणारी सुनावणी आणि मंत्रिपदाच्या वाटपाबाबत चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. अजित पवार हे आज रात्री दहाच्या सुमारास चर्चगेट येथील निवासस्थानातून निघाले. त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव पार्थ पवारही होते. शिवाय त्यांच्या कारमध्ये आणखी एक व्यक्ती होती. रात्री साडे दहाच्या सुमारास ते वर्षा बंगल्यावर पोहोचले. यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत हे वर्षा बंगल्यातून बाहेर पडले. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पार्थ पवार यांच्यासह भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप नेते विनोद तावडे, गिरीश महाजन आणि आशिष शेलार आदी नेते उपस्थित होते, असं सांगण्यात येतं. या बैठकीला काही वकीलही उपस्थित होते, असं समजतं. उद्या सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तापेचावर सुनावणी होणार आहे. आजच्या सुनावणीवेळी कोर्टाने सरकारला पाठिंब्याची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे या कागदपत्रांची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी अजित पवार हे वर्षा बंगल्यावर पोहोचले होते, असं सूत्रांचं म्हणणं आहे. काही कागदपत्रांवर अजित पवारांच्या सह्या लागणार आहेत. त्यामुळे फोनवरून या गोष्टी होऊ शकणार नसल्यानेही पवार हे मुख्यमंत्र्यांना भेटायला आल्याचं खास सूत्रांनी सांगितलं. अजितदादा गटाला १२ मंत्रिपदं दरम्यान, मुख्यमंत्र्यासोबतच्या या बैठकीत अजित पवार हे मंत्रिपदाबाबतची चर्चा करणार असल्याचं सांगण्यात येतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे नेते भूपेंद्र यादव आणि अजित पवार या तिघांच्याच उपस्थितीत मंत्रिपदाच्या वाटपावर चर्चा करण्यात आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. अजित पवार यांच्या गटाला भाजपकडून १२ मंत्रिपदे देण्यात येणार असून १५ महामंडळे देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतं. ही खाती कोणती असतील आणि त्याचं वाटप कसं करायचं? याचा या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याचं समजतं. त्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून त्यावर हिरवांकदील मिळवला जाईल, असं सूत्रांनी सांगितलं.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/35vMNoI
via IFTTT