मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी, सगळ्यात महत्त्वाची आणि आजवरची सर्व राजकीय गणित बदलणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आता लवकरच राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार आहे. राज्यात ही सत्ता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पाठिंब्यावर अस्तित्वात येणार आहे. आज दिवसभर काँग्रेस हायकमांड आणि राज्यातील नेत्यांची सतत चर्चा सुरु होती. या मॅरेथॉन चर्चेनंतरच अखेर काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
या निर्णयानंतर एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक शिवसेना नेते हे राजभवनाकडे रवाना झाले आहेत. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं पाठिंब्याचं पत्र हे राज्यपालांना शिवसेना देणार आहे. त्यामुळे लवकरच महाआघाडीचं सरकार स्थापन होणार आहे. गेले काही दिवस वेगवेगळ्या पक्षांमध्ये चर्चाच सुरु होत्या. पण काल (शनिवार) राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला आमंत्रण दिल्यानंतर सगळ्या घडामोडी वेगाने घडल्या याचवेळी सोनिया गांधी आणि शरद पवार यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्यात महाशिवआघाडीचं सरकार येणार असल्याचं निश्चित झालं आहे.
शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रसेच्या आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र हे राजभवनवर काही वेळापूर्वीच पाठविण्यात आलं आहे.
