Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कुठल्याही क्षणी आता 'ती' बातमी येऊ शकते!



नवी दिल्ली: महाराष्ट्रात भाजप सत्ता स्थापन करु न शकल्याने गेल्या दोन दिवसापासून राज्यात मोठ्या घडामोडी सुरु झाल्या आहेत. कारण की, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात सत्तास्थापनेसाठी सतत चर्चा सुरु आहे. अशावेळी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष हे सध्या दिल्लीकडे लागून राहिलं आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस हे सुरुवातीपासूनच अनुकूल होतं. पण वैचारिक मतभेदामुळे काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्यास प्रतिकूल असल्याचं सांगण्यात येत होतं. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस आपल्या राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांसोबत आणि आमदारांसोबत चर्चा करत आहे. त्यामुळे ज्या बातमीची वाट संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे 'ती' बातमी आता कुठल्याही क्षणी येऊ शकते. पण ही बातमी सकारात्मक असणार की, नकारात्मक याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही याबाबत काँग्रेसमध्ये बराच काथ्याकूट सुरु आहे. राज्यातील काँग्रेस आमदारांची अशी इच्छा आहे की, भाजपला सत्तेपासून बाहेर ठेवण्यासाठी सध्या शिवसेनेला पाठिंबा देणं गरजेचं आहे. पण हायकमांड याबाबत अद्यापही निर्णयच घेत नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे राज्यात सत्तेचं नवं समीकरण पाहायला मिळणार की, राज्याची वाटचाल राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने होणार हे देखील स्पष्ट होईल. दरम्यान, काँग्रेसच्या निर्णयानंतरच राष्ट्रवादी काँग्रेस आपला निर्णय जाहीर करणार असल्याचं सुरुवातीलाच जाहीर करण्यात आलं आहे. राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हे शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी आग्रही आहेत. मात्र, सोनिया गांधी यांच्याच निर्णयावर सारं काही अवलंबून असणार आहे.

सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी शिवसेनेसमोर अशी अट ठेवली होती की, आमच्यासोबत सत्तास्थापन करण्याआधी एनडीएतून बाहेर पडावं. याच अटीनुसार शिवसेनेचे केंद्रातील कॅबिनेट मंत्री अरविंद सावंत यांनी आजच आपला राजीनामा देखील दिला आहे. त्यामुळे आता शिवसेनेने आपल्याकडून युती जवळपास तोडली आहे. त्यामुळे आता सारं काही काँग्रेसच्या निर्णयावर अवलंबून आहे.