मुंबई : राज्यात सत्तेचे वेगळे समीकरण निर्माण होत असताना आता कोण मुख्यमंत्री होणार हा प्रश्न राज्याच्या जनतेला पडलेला आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस, राष्ट्रवादी या सारख्या अनुभवी पक्षांच्या सोबत महाशिवआघाडी करताना शिवसेना एखाद्या कसलेला नेत्याला मुख्यमंत्रिपदी बसविण्याची शक्यता आहे. यात सर्वात आघाडीवर नाव आहे ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे, तर दुसरे नाव हे एकनाथ शिंदे, तिसरे नाव सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे यांचे असल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दबावापुढे आदित्य ठाकरे यांचा टीकाव लागणार नाही. त्यामुळे त्यांना हे मुख्यमंत्रीपद देण्यास शिवसेनेच्या नेते साशंक आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे नाव आमदारांच्या बैठकीत पुढे आले आहे. या संदर्भातील पोस्टर मातोश्रीच्या अंगणात लागले आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणे महाराष्ट्राची गरज असल्याचे म्हटले जात आहे.
तर शिवसेना विधिमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या गळ्यात एक शिवसैनिक आणि आक्रमक नेता म्हणऊन मुख्यमंत्रिपदाची माळ पडू शकते. तसेच फलकही ठाण्यात ठिकाणी काही दिवसांपूर्वी लागले होते. तसेच १९९५ आणि २०१४ च्या युतीच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या सुभाष देसाई यांच्या नावाचीही मुख्यमंत्री म्हणून चर्चा आहे. शिवसेनेचा एक मवाळ चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा त्यांना पाठिंबा मिळू शकतो, अशी चर्चा सुरू आहे.
शिवसेनेतील एका गटाच्यामते आता आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनविण्याची 'हीच ती वेळ' आहे. आता नाही तर कधीच नाही. असे त्यांचे म्हणणे आहे. आता शिवसेनेसाठी अनुकूल परिस्थिती आहे. अशा परिस्थिती भविष्यात येईल की नाही याबाबत शिवसेनेतही शंका आहे. त्यामुळे लोहा गरम आहे तर हातोडा मारा अशी भूमिका शिवसेनेतील काही नेत्यांनी घेतली आहे. आदित्य ठाकरे यांच्या नावाचे बॅनरी काही दिवसांपूर्वी मातोश्रीच्या अंगणात लागले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू मी आदित्य ठाकरे शपथ घेतो की... अशा आशयाचे हे बॅनर होते.
हे होणार उपमुख्यमंत्री
राज्यात पहिल्यांदा दोन उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना उपमुख्यमंत्रीपद मिळू शकते. यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांना तर काँग्रेसकडून यशोमती ठाकूर किंवा बाळासाहेब थोरात यांना हे उपमुख्यमंत्रीपद मिळू शकते अशी शक्यता निर्माण झाली आहे.
