अहमदनगर: सोन्याचे दागदागिने, रोकड रक्कम चोरीच्या घटना नेहमीच ऐकण्यात येतात. पण आता चक्क चोरांनी आपला मोर्चा कांद्याकडे वळवला आहे. कांद्याचे दर दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे कांद्याच्या गोण्याच चोरण्याचा प्रयत्न संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार या भागात मंगळवारी पहाटेच्या सुमारास झाला. शेतमालक झोपेत असताना शेतात असलेल्या कांदाचाळीत साठवून ठेवलेल्या कांद्याला लक्ष्य करीत तीस गोण्या कांद्याची चोरी करण्याच्या प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला. मात्र, आवाजाने शेतकरी जागा झाल्यामुळे कांदे चोरीचा प्रयत्न फसला व चोरट्यांनी कांद्याच्या गोण्या फेकून देत तेथून पळ काढला. गेल्या काही दिवसांपासून बाजारामध्ये कांद्याची आवक कमी झाली असल्यामुळे किरकोळ बाजारात कांद्याचे भाव शंभरीपार गेले आहेत. कांद्याची मागणी वाढत असल्यामुळे हे भाव अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यातच हिवरगाव पठार भागात कांदा चोरीचा प्रयत्न झाला आहे. हिवरगाव पठार येथील शेतकरी संतोष दराडे यांनी काबाड कष्ट करुन यंदा शेतात कांद्याचे पिक घेतले. त्यापैकी बहुतांश पिकाचे परतीच्या व अवकाळी पावसाने नुकसान झाले. थोड्याफार शेतात शिल्लक असलेल्या कांदा काढून तो कांदा शेतातील कांदाचाळीत त्यांनी साठवला होता. कांद्याला उच्चांकी बाजारभाव मिळत असल्याने कांदा विक्रीसाठी मार्केटला घेवूनही जायचा होता. मात्र मंगळवारी पहाटेच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी शेतातील कांदाचाळीत साठवलेला सुमारे तीस गोण्या कांदा चोरून नेण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी कांद्याच्या शेताच्या कडेला असलेल्या बांधावर आणून ठेवण्यास सुरूवात केली. बांधावर आणलेल्या गोण्या केवळ गाडीमध्ये टाकणे बाकी होते. मात्र, कांदाचाळीमध्ये सुरू असलेल्या गडबडीमुळे शेतमालक दराडे झोपेतून जागे झाले. त्यामुळे चोरट्यांनी कांदा गोण्या त्याठिकाणी सोडून धूम ठोकली.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2rdHZFY
via IFTTT