Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अंगणवाडीच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आंदोलन



ठाणे : गेल्या दहा महिन्यांपासून वाढीव मानधनाची थकबाकी द्यावी, २०१९ मधील भाऊबीज मिळावी, मोबाइलचे रिचार्ज वाढल्याने १६०० रुपयांऐवजी २३०० रुपये भरावे लागतात, याचा विचार व्हावा, यांसह अनेक प्रलंबित प्रश्नांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने बेलापूर येथील आयुक्त कार्यालयासमोर १० डिसेंबर रोजी आंदोलन करण्यात येणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून अंगणवाडी सेविका वेगवेगळ्या मागण्यांसाठी सरकारी दरबारी गाऱ्हाणे मांडत आहेत. पण प्रशासनस्तरावर याची दखल घेतली जात नसल्याने अखेर सेविकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. वाढीव मानधन, थकीत रक्कम लवकरच मिळावी, भाऊबीज रक्कम मिळावी, सर्व थकीत प्रवासबिले, अमृताआहार योजना बिले लवकरात लवकर द्यावी, अंगणवाडी केंद्र भाडे रक्कम वाढवण्यासाठी नवीन प्रस्ताव तयार करावा, मोबाइलवरील हजेरी आणि मुख्यसेविकांकडील हजेरी दोन्हींचा समन्वय करून कर्मचाऱ्यांना मानधन द्यावे, सुट्टीच्या दिवशी काम लावू नये, ऑगस्ट २०१९ पासून मोबाइल प्रोत्साहन भत्ता रक्कम त्वरित द्यावी, तीन महिन्यांतील सर्व थकीत एकरकमी निवृत्ती लाभाची रक्कम द्यावी, रिक्त जागांबाबत न्यायालयीन निर्णयानंतर त्वरित भरती, पात्र मदतनीस यांच्या सेविकापदी बढतीबाबत लवकर निर्णय घ्यावा, या प्रश्नांसदर्भात आयुक्त इंद्रा मालो यांना निवेदन देण्यात येणार आहे. या मागण्यांचा विचार न झाल्यास सर्व कर्मचारी ८ जानेवारी रोजी एक दिवसीय संप करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी दिला.