Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

ठाकरे मंत्रिमंडळाचा आज नव्या चेहऱ्यांकडं लक्ष


महाराष्ट्रातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीच्या सरकारचा आज, सोमवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार असून तिन्ही पक्षांचे एकूण ३६ मंत्री शपथ घेणार आहेत. तिन्ही पक्षांनी आपापसांत कोणती खाती वाटून घ्यायची हे निश्चित झाले असले तरी पक्षांतर्गत खातेवाटपाचा घोळ मात्र रात्री उशिरापर्यंत सुरू होता. दरम्यान, मंत्रिमंडळात अपेक्षित स्थान न मिळाल्याने घटक पक्षांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे समजते.


विधानसभेच्या प्रांगणात दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शपथविधी सोहळा पार पडणार आहे. ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याने शपथविधी सोहळ्याची रविवारी जय्यत तयारी सुरू होती. विधिमंडळ परिसरातील पार्किंगच्या जागेतच मुख्य स्टेज आणि त्याला लागूनच भव्य मंडप उभारण्यात आला आहे. सुमारे ५०० ते ७०० आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे. या मंडपामध्ये १२ पेक्षा जास्त स्क्रीन उभारण्यात आले असून विधिमंडळ परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.