मुंबई: कोविड १९ च्या चाचणीसाठी चीनमधून मागवण्यात आलेल्या रॅपिड टेस्टिंग किट्स सदोष निघाल्यानं देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. 'चीनमुळंच जगभरात करोना पसरल्याचा आरोप होत असताना आणि त्यांची कोणतीही उत्पादनं भरवशाची नसताना त्यांच्याशी व्यापार करण्याचा निर्णय कसा झाला? करोना युद्ध काळात मोदी सरकारने इतकी मोठी गफलत कशी केली?,' असा सवाल शिवसेनेनं केला आहे. करोनाग्रस्तांच्या चाचण्या वेगानं व्हाव्यात व त्यांना तातडीनं उपचार मिळावेत यासाठी केंद्र सरकारनं रॅपिड टेस्ट किट्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला. सर्व राज्यांना हे किट्स केंद्र सरकारकडून पुरवण्यात आले. महाराष्ट्राला हजार रॅपिड टेस्ट किट्स मिळाले. मात्र, आता हे सर्व किट्स भंगारात टाकून देण्याची वेळ आली आहे. याउलट छत्तीसगड सरकारनं दक्षिण कोरियाकडून घेतलेले किट्स उत्तम रिझल्ट देत आहेत. यावरून शिवसेनेनं केंद्र सरकारला घेरलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून केंद्र सरकारच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे.
