जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल सहा करोनाबाधित सापडले आहेत. यामधील पाच रुग्ण हे नगर शहरातील असून एक रुग्ण पारनेर येथील आहे. पारनेर येथील रुग्णाचा कालच मृत्यू झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ६० झाली आहे. आज सकाळी जिल्हा रुग्णालयाकडे ११ अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी सारसनगर येथील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर सायंकाळी पुन्हा ५ अहवाल प्राप्त झाले. हे पाचही जण करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. या पाच अहवालामध्ये नगर येथील चार व पारनेर येथील एका रुग्णाच्या अहवालाचा समावेश आहे. सारसनगर येथील बाधित आढळलेली व्यक्ती ही ड्रायव्हर असून त्याने पुणे-मुंबई प्रवास केला आहे.
या व्यक्तीला दोन दिवसापूर्वी सर्दी, खोकला याचा त्रास होऊ लागल्याने त्याला सुरुवातीला खासगी रुग्णालयात आणि नंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच त्याच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. आज सकाळी अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही व्यक्ती करोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. काल सुभेदार गल्ली येथील एका महिलेला करोना झाल्याचे समोर आले होते. या महिलेच्या निकट संपर्कातील व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. हे अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाले असून त्यात या महिलेचा मुलगा, सून आणि शेजारी यांनाही करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
तसेच त्या महिलेने ज्या खासगी डॉक्टरकडे उपचार घेतले होते, तेथील रिसेप्शनिस्टही करोनाबाधित आढळून आली आहे. दरम्यान, पारनेर तालुक्यातील निघोज येथील एका व्यक्तीचा काल मृत्यू झाला होता. त्याचा अहवालही आज पॉझिटिव्ह आला आहे.
