
मुंबई बातम्या : भारताच्या भूभागावर नेपाळने दावा सांगितल्यामुळं देशातील राजकीय वातावरण तापले आहे. केंद्रातील मोदी सरकार या प्रश्नी थंड बसल्याचा थेट आरोप शिवसेनेनं केला आहे. नेपाळची मुंगी हत्तीच्या कानात शिरली आहे, पण हत्ती सोंडेचे फटके मारायला तयार नाही. मुंगीचा रंग हिरवा नाही. येथे हिंदू-मुसलमान झगडा होऊ शकत नाही, हेच यामागचे रहस्य आहे,' असा घणाघात शिवसेनेनं केला आहे. नेपाळनं आपल्या देशाचा नवा नकाशा नुकताच प्रसिद्ध केला आहे. त्यात भारताचा लिपुलेख, कालापानी, लिंपियाधुरा हा भाग नेपाळचा म्हणून दाखवला आहे. नेपाळच्या या नकाशा प्रकरणावर 'सामना'च्या अग्रलेखातून भाष्य करताना शिवसेनेनं मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. नेपाळसारखे राष्ट्रही 'महासत्ता' वगैरे बनू पाहणाऱ्या भारताला डोळे वटारते हे चांगले लक्षण नाही. चीनच्या कच्छपी लागून हिंदुस्थानला आव्हान देत असेल तर भक्त मंडळी व त्यांचे दिल्लीश्वर कोणती पावले उचलणार,' असा खडा सवालही शिवसेनेनं केला आहे.