नागपूर - नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी भाजपाने आक्रमक होत शेतकर्यांना २५ हजाराची मदत तात्काळ जाहीर करा तेव्हाच कामकाज करू देऊ, असा पवित्रा घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर भाजपा आमदारांनी बॅनरबाजी करायला सुरुवात केली. वेलमध्ये उतरलेल्या भाजपा आमदारांनी थेट उद्धव ठाकरेंसमोरच बॅनर धरल्याने बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी हा बॅनर हिसकावण्याचा प्रयत्न केला त्यावेळी भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांनी त्यांना विरोध केला. गायकवाड आणि पवार यांच्यात शाब्दीक चकमक होत मुद्यावरून हे दोघे गुद्द्यावर आले आणि दोघात हाणामारी सुरू झाली. या वेळी या दोघांची सोडवासोडव करण्यात आली आणि विधानसभेचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आले. पुन्हा कामकाज सुरू झाले तेव्हा गदारोळ सुरुच राहिल्याने दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.
सत्तापासून दुरावलेलं भाजप अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून आक्रमक दिसून आलं. काल सावरकरांच्या मुद्यावरून आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आज शेतकर्यांच्या प्रश्नावरून भाजपाने सभागृहामध्ये प्रचंड घोषणाबाजी सुरू केली. शेतकर्यांना मदत मिळेपर्यंत कामकाज स्थगित करण्यात यावे, अशी मागणी करून भाजपाच्या आमदारांनी वेलमध्ये उतरून बॅनरबाजी सुरु केली. या वेळी भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर बॅनर धरले. या वेळी बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी बॅनर हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि तिथेच या दोघात शाब्दीक चकमक होऊन हाणामारी सुरू झाली. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी संजय गायकवाड यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. हाणामारीचा प्रकार घडल्यानंतर ३० मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. आज जे सभागृहात घडले ते आजपर्यंतच्या इतिहासात अत्यंत चुकीचे घडल्याचे सांगत एकमेकांच्या अंगावर जाण्याचा अधिकार कुणालाही नाही. मुख्यमंत्र्यांसमोर बॅनर फडकवणं चुकीचं आहे, असे म्हणत सत्ताधारी आणि विरोधकांना मी समज देतो, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगून पुन्हा सभागृह सुरू केलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही सभागृहाच्या कामकाजाला मदत करू, कोणीही अंगावर जाणार नाही, असे सांगत शेतकर्यांना २५ हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, तसेच मदत मिळेपर्यंत सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात यावे, अशी मागणी करत आक्रमक भूमिका घेतली तर दुसरीकडे जयंत पाटलांनी फडणवीसांचा समाचार घेताना सत्तेत असताना फडणवीसांनी शेतकर्यांना मदत का केली नाही, महाराष्ट्राचा पैसा केेंद्राला का परत पाठवला, असा सवाल उपस्थित केला. विरोधकांना आज शेतकर्यांचा पुळका आला आहे, तुमचा पुळका नाटकी आहे, हे जनता समजून आहे. आम्ही शेतकर्यांना पूर्ण ताकतीने मदत देणार असल्याचे जयंत पाटलांनी सांगितले.
