हिंगोली पुन्हा हादरलं; आणखी एका कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील कर्जबाजारी शेतकऱ्याने हिंगोलीनजीक आत्महत्या केल्याच्या घटनेला काही तास उलटत नाहीत, तोच तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे या गावातील एका ४० वर्षीय शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आज, सोमवारी सकाळी ही घटना घडली.आयसोलेशन आणि क्वारन्टाइन कालावधी कमी केल्याने लक्षणं नसलेल्या पेशंट्सना घरी सोडणार येईल.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिग्रस कऱ्हाळे येथील बबन लक्ष्मण कऱ्हाळे (वय - ४०) यांच्या वडिलांच्या नावावर चार एकर शेती आहे.
एकत्रित कुटुंबातील बबन हेच शेतीची कामे पाहत होते. शेतीसाठी व मुलीच्या लग्नासाठी त्यांनी दोन लाखांहून अधिक कर्ज घेतले होते. दरम्यान, रविवारी १० मे रोजी रात्री शेतात झोपण्यासाठी जातो असे कुटुंबीयांना सांगून कऱ्हाळे हे शेतात गेले. मात्र, आज सोमवारी सकाळी ते घरी परतले नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शोध सुरू केला.
यावेळी बबन कऱ्हाळे यांचा मृतदेह त्यांच्या शेताच्या धुऱ्यावरील झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. या प्रकरणी गजानन कऱ्हाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

